विदर्भपूत्र सुरेश हावरे सीईओ निवड समितीचे सदस्य

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासकडून नियुक्ती

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
पथ्रोट, 
suresh-havare : येथील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व. दादासाहेब हावरे याचे चिरंजीव, साईबाबा संस्थान शिर्डीचे माजी अध्यक्ष, अणुशास्त्रज्ञ तथा प्रसिद्ध उद्योजक आणि अमरनाथ श्राईन बोर्डचे संचालक विदर्भपूत्र डॉ. सुरेश हावरे यांची श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासने मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) निवड समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे.
 
 

amt 
 
 
 
अयोध्येतील श्रीराम मंदिराचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी न्यासने मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सीईओ निवडण्यासाठी न्यासने तीन सदस्यीय समिती स्थापन केली असून त्यात डॉ. सुरेश हावरे यांचा समावेश आहे. सुरेश हावरे हे श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डीचे दहा वर्षे अध्यक्ष राहिले आहेत. त्यांना मंदिर व्यवस्थापनाचा मोठा व यशस्वी अनुभव आहे. ते मूळचे एक प्रसिद्ध उद्योजक आणि अणुशास्त्रज्ञ आहेत. तीन सदस्यांच्या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्ती प्रदीप कोहली, निवृत्त लेफ्टनंट जनरल विष्णुकांत चतुर्वेदी आणि महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पथ्रोट येथील सुरेश हावरे यांचा समावेश आहे. ही समिती सीईओ पदाच्या निवडीची संपूर्ण प्रक्रिया करेल. समितीची पहिली बैठक २२ जुलैला होणार आहे.
 
 
डॉ. सुरेश हावरे यांनी साईबाबा संस्थान अध्यक्षीय कार्यकाळात शिर्डीत विविध उपक्रम राबविले आहेत. मंदिरांचे व्यवस्थापन व योग्य मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रम तयार करण्याची कल्पना त्यांनी मांडली आहे. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडीबद्दल पथ्रोटसह जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
 
 
डाॅ. हावरे यांचे वडील व तत्कालीन भाजपा नेते स्व. दादासाहेब हावरे यांचा डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत जमलेल्या लाखो कारसेवकांमध्ये समावेश होता. त्यांच्याच चिरंजीवावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचा सीईओ निवडण्याची जबाबदारी आली आहे.