वाशीम,
collector yogesh kumbhejkar आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर आणि शाश्वत होऊ शकतो. प्रशिक्षणातून मिळालेले ज्ञान प्रत्येक प्रशिक्षित पशुपालकाने आपल्या परिसरातील इतर पशुपालकांपर्यंत पोहोचवावे, जेणेकरून जिल्ह्यात आधुनिक पशुसंवर्धनाला चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ७ जुलै रोजजी कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे प्रशिक्षण घेतलेल्या पशुपालकांशी संवाद साधण्यात आला. पशुसंवर्धन विभागामार्फत निवड करण्यात आलेल्या जिल्ह्यातील १५ पशुपालकांना १२ ते १४ मे २०२६ या कालावधीत तीन दिवसीय आधुनिक पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विषयक प्रशिक्षण देण्यात आले होते. प्रशिक्षणादरम्यान जातिवंत दुधाळ जनावरांची निवड, मुरघास निर्मिती, मिल्किंग मशीनचा वापर, चारा लागवड, कालवडींचे संगोपन, संतुलित पशुआहार, मुक्त संचार गोठा व्यवस्थापन तसेच आधुनिक दुग्धव्यवसायाच्या विविध तंत्रज्ञानाची सविस्तर माहिती तज्ज्ञांनी दिली.
या प्रशिक्षणात ऋषीकेश किरण वानखडे (कासोळा, ता. मंगरुळनाथ), सतीश सुभाष सरनाईक (शेलगाव बु., ता. मालेगाव), चेतन सुनील शिंदे (शहापूर, ता. मंगरुळनाथ), सदानंद नारायण देशमुख (गोवर्धन, ता. रिसोड), दीपक सुभाष वारकड (खरोळा, ता. वाशीम), अन्वर लालुवाले (जांब, ता. कारंजा), जावेद लालुवाले (जांब, ता. कारंजा), सुभान रायलीवाले (जांब, ता. कारंजा), कैलास रामदास वावगे (पिंपरी मो., ता. कारंजा), मुमताज मोहम्मद (नांदखेडा, ता. मंगरुळपीर), नंदकिशोर घुगे (मैराळडोह, ता. मालेगाव), योगेश गिरी (मसोला, ता. मंगरुळनाथ), मधुकर राऊत (भोयता, ता. वाशीम), प्रसाद गजानन सरोदे (मालेगाव) आणि विकास शेशराव आडे (वाशीम) यांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर करून दुग्ध उत्पादनात वाढ करावी तसेच इतर पशुपालकांनाही या तंत्रज्ञानाची माहिती देऊन मार्गदर्शन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.