नागपूर,
tubelight-cfl-pollution : फ्ल्युरोसंट ट्यूब आणि सीएफएल दिव्यांमधील घातक मर्क्युरीमुळे होणारे पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने देशात प्रथमच नाविन्यपूर्ण आणि शास्त्रोक्त विल्हेवाट प्रक्रिया विकसित केली आहे. विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागाने विकसित केलेल्या या संशोधनाला दोन पेटंट प्राप्त झाले असून, नागरी स्वच्छता आणि पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
- दोन पेटंटसह संशोधनाला यश
भौतिकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. संजय ढोबळे यांनी संशोधक विद्यार्थी संकेत हेलोडे आणि अभिजीत कदम यांच्या सहकार्याने ही प्रक्रिया विकसित केली. विद्यापीठाच्या संशोधन व विस्तार विभागाच्या आर्थिक सहाय्याने साकारलेल्या या संशोधनामुळे निकामी मर्क्युरी दिव्यांची सुरक्षित विल्हेवाट लावणे शक्य होणार आहे.
एलईडी दिवे मर्क्युरीमुक्त असले तरी फ्ल्युरोसंट ट्यूब आणि सीएफएलमध्ये मर्क्युरीचे प्रमाण असल्याने ते फुटल्यानंतर हा विषारी घटक हवा, पाणी आणि मातीमध्ये मिसळून प्रदूषण निर्माण करतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. अनेक देशांनी अशा दिव्यांच्या वापरावर निर्बंध घातले असले, तरी भारतात त्यांच्या विल्हेवाटीसाठी प्रभावी व्यवस्था उपलब्ध नव्हती.
संशोधकांनी घराघरांतून निकामी दिवे सुरक्षितरीत्या गोळा करण्यासाठी विशेष 'लॅम्प कलेक्शन युनिट' विकसित केले असून, त्यालाही पेटंट मिळाले आहे. कचरा संकलन वाहनांवर हे युनिट बसवून दिवे न फुटता संकलित करता येतील. त्यानंतर विशेष बंदिस्त यंत्रणेत दिवे फोडून रासायनिक प्रक्रियेद्वारे मर्क्युरी वेगळा केला जाईल, ज्यामुळे तो वातावरणात मिसळणार नाही. संकलित मर्क्युरीचा पुनर्वापरही करता येणार आहे.
- स्वच्छ शहरासाठी महत्त्वाची पायरी
या संशोधनामुळे मर्क्युरीमुळे होणारे प्रदूषण रोखण्यास मदत होणार असून, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर उभारण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले आहे. या कामगिरीबद्दल कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खंडाळ आणि संशोधन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. दादासाहेब कोकरे यांनी डॉ. ढोबळे आणि त्यांच्या संशोधक विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.