मुंबई,
uddhav thackeray शिवसेना ठाकरे गटाला सलग धक्के बसत असल्याची राजकीय चर्चा सुरू असतानाच आता पक्षातील संभाव्य मोठ्या बंडखोरीच्या दाव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ठाकरे गटातील सहा खासदारांनी साथ सोडल्यानंतर सचिन आहिर यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले. सचिन आहिर यांनी थेट विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी अर्ज केल्याने ते शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे संकेत मिळाले. या घडामोडीमुळे उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनाही मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सचिन आहिर हे आदित्य ठाकरे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जात होते.
दरम्यान, आणखी काही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची आणि ते मोठ्या बंडाच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी काल मातोश्रीवर पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. मात्र, या बैठकीला परभणीचे आमदार राहुल पाटील अनुपस्थित राहिले. त्यांच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे ते बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले.
भाऊचा दावा
या सर्व घडामोडींमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर हिंदुस्थानी भाऊ याने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवरून एक व्हिडीओ शेअर करत मोठा दावा केला आहे. सप्टेंबर महिन्याच्या 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून मोठी बंडखोरी होणार असल्याचा दावा त्याने या व्हिडीओमध्ये केला. यावेळी त्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली.व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊने उद्धव ठाकरे यांना उद्देशून म्हटले, "उद्धव साहेब, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. माहितीय ना? मी मध्ये बोललेलो होतो ना..." त्यानंतर त्याने दावा केला की, "सांभाळा, नाही तर पंधरा आमदार आणि 25 नगरसेवक जायच्या मागे आहेत. सचिन आहिर यांनी पहिला बॉम्ब फोडला आहे. सप्टेंबरपर्यंत खूप काही जाणार आहे. सप्टेंबरची 7 तारीख लक्षात ठेवा, खूप काही जाणार आहे."
याच व्हिडीओमध्ये हिंदुस्थानी भाऊने संजय राऊत यांचा उल्लेख करत त्यांच्यावर टीका केली. त्याने राऊत यांना "भांडुपचा खोटा अनिल कपूर" असे संबोधत, "तुमचा अनिल कपूर काय बोलतो आहे? तुडवा ऑपरेशन चालू करणार..." असे वक्तव्य केले.सचिन आहिर यांच्या पार्श्वभूमीवर भाष्य करत हिंदुस्थानी भाऊने पुढे म्हटले, "अरे सचिन आहिर कोण आहे? दगडी चाळीचे नाव ऐकले आहे का? सात रस्ता, दगडी चाळ… अरुण गवळी ऊर्फ डॅडी… बाळासाहेब काय बोलायचे… तुमच्याकडे दाऊद आहे तर आमच्याकडे गवळी आहे."तसेच, 7 सप्टेंबर रोजी तब्बल 15 आमदार ठाकरे गटातून बाहेर पडतील, असा दावा हिंदुस्थानी भाऊने या व्हिडीओमधून केला आहे. मात्र, या दाव्यांबाबत संबंधित नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.