नवी दिल्ली,
vaibhav-suryavanshi : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी२० सामन्यात युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीकडून पुन्हा एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तो क्रीजवर जास्त वेळ टिकू शकला नाही. ट्रेंट ब्रिजवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात या १५ वर्षीय फलंदाजाने काही आक्रमक फटके मारले, पण तो जोफ्रा आर्चरच्या वेगासमोर आणि अचूक रणनीतीसमोर टिकू शकला नाही. केवळ १३ धावा करून वैभव पॅव्हेलियनमध्ये परतला.
वैभवची बॅट पुन्हा चालली नाही
मँचेस्टरमध्ये आपल्या टी२० पदार्पणात १४ धावा करणारा वैभव यावेळी केवळ एका धावेने कमी पडला. त्याचा डाव त्याचाच आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा सहकारी खेळाडू जोफ्रा आर्चरने संपवला. आर्चरच्या वेगवान बाउन्सरवर पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात वैभवला थोडा उशीर झाला आणि चेंडू त्याच्या ग्लोव्हजची कड घेऊन यष्टीरक्षक जोस बटलरच्या हातात गेला.
आर्चरचा पहिला चेंडू १४४ किमी प्रतितास वेगाचा बाउन्सर होता, जो वैभवने चुकवला. पुढचा चेंडूही आखूड होता, पण ऑफ-स्टंपच्या बाहेर. यावेळी, वैभवच्या बॅटला जाड कड लागली आणि चेंडू थर्ड मॅनवरून षटकार गेला. त्यानंतर वैभवने जोश टंगच्या दोन चेंडूंवर चार धावा आणि एक धाव घेतली. मात्र, तिसऱ्या षटकात, जेव्हा आर्चर गोलंदाजीसाठी परत आला, तेव्हा त्याने लेग स्टंपवर अचूक बाउन्सर टाकला. त्यानंतर वैभवने पुल शॉट मारण्याचा प्रयत्न केला आणि तो झेलबाद झाला.
पॉवरप्लेमध्ये टीम इंडियाची वाताहत झाली
वैभव बाद होण्यापूर्वीच, जोश टंगने अभिषेक शर्माला बाद केले होते. त्यानंतर त्याने इशान किशनची विकेट घेतली. आर्चरने त्याच षटकात कर्णधार श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनाही बाद केले. अवघ्या पाच षटकांत भारताची धावसंख्या झपाट्याने ५२ धावांवर पाच गडी बाद अशी झाली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकाने भारतीय फलंदाजीचे पितळ उघडे पाडले. विल जॅक्सने या षटकात केवळ दोन धावा दिल्या, ज्यामुळे सहा षटकांच्या अखेरीस भारताची धावसंख्या ५४/५ झाली. यासोबतच भारताने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक नकोसा विक्रमही रचला आहे. पॉवरप्लेमध्ये आपल्या पहिल्या पाच विकेट गमावण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ आहे.