वाशीम,
traffic police उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ७ जुलै रोजी शहर वाहतूक शाखा, वाशीम मार्फत शहर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या वाहनचालकाविरुद्ध विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान एकू १७३ वाहनांची तपासणी करण्यात आली. सदर वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात आली असून १ लाख ४५ हजार २०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला.
वाहतूक शाखेने हाती घेतलेल्या धडक मोहीमेत वैध परवाना नसलेल्या २, विनानंबर प्लेट वाहन ३, फॅन्सी नंबर प्लेट ३, नो पार्किंग ९९, ट्रिपल सीट ४१, पोलिस आदेशाचे उल्लंघन ७, मोबाईलवर बोलत वाहन चालविणे ७, अतिरिक्त प्रवासी वाहतूक २०१, काडी काच २ अशा एकूण १७३ वाहनांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. वाहतुकीची शिस्त राखणे, अपघातांना प्रतिबंध करणे व नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
वाहन चालविताना हेल्मेट व सीटबेल्टचा वापर करावा, वैध वाहन परवाना व आवश्यक कागदपत्रे जवळ बाळगावीत, वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, आपले वाहन पार्किंग मध्येच पार्क करावे तसेच सर्व वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून सुरक्षित वाहतुकीस सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणार्यांविरुद्ध भविष्यातही अशाच प्रकारे सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शहर वाहतूक पोलिस प्रशासनाने दिली.