आठवडी बाजाराचा पुन्हा रस्त्यावर कब्जा

    दिनांक :08-Jul-2026
Total Views |
सेलू,
weekly market शहरातील आठवडी बाजाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, काही महिन्यांपूर्वी प्रशासनाने मोठ्या प्रयत्नानी रस्त्यावरून हटवून मूळ जागी स्थलांतरित केलेला बाजार पुन्हा हळूहळू रस्त्यावर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि सर्वसामान्यांना होणारा त्रास पुन्हा डोके वर काढत आहे.
 

weekly market encroaches on roads again in selu traffic congestion concerns rise 
मुख्याधिकारी आणि पोलिस प्रशासनाच्या संयुक्त कारवाईनंतर बाजार मूळ जागी हलविण्यात आला होता. त्यावेळी बाजार परिसरात स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले होते. शहरातील प्रमुख मार्ग मोकळे झाल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी झाला होता.मात्र, गेल्या काही आठवड्यांपासून पार्किंगसाठी राखीव ठेवलेल्या मार्गावरच काही व्यापार्यांनी पुन्हा दुकाने थाटण्यास सुरूवात केल्याची बाब समोर आली आहे. परिणामी, आठवडी बाजाराच्या दिवशी सायंकाळनंतर वाहनांची मोठी गर्दी होत असून नागरिकांना मार्ग काढणेही कठीण होत आहे. प्रशासनाच्या निर्देशांकडे दुर्लक्ष करून काहींना नियमबाह्य पद्धतीने रस्त्यावर व्यवसाय करण्याची मुभा दिली जात असल्याचा आरोपही नागरिकांकडून केला जात आहे.
बाजार मूळ जागी गेल्यानंतर शहराला मोठा दिलासा मिळाला होता. आता पुन्हा जुन्याच समस्या सुरू झाल्या आहेत. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा. रुग्णवाहिका, शालेय वाहने आणि सामान्य नागरिकांना बाजाराच्या दिवशी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. नियम सर्वांसाठी समान असले पाहिजे. पुढील आठवडी बाजाराच्या दिवशी नगरपंचायतीचे कर्मचारी आणि संबंधित अधिकार्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून रस्त्यावर लागणारी दुकाने हटवावीत तसेच बाजाराची शिस्त कायम राखावी, अशी मागणी केली जात आहे.