अग्रलेख
wind and rain मंगळवारी देहूतून संत तुकाराम महाराजांची पालखी मार्गस्थ झाली तर आळंदीतून बुधवारी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करेल. पुणे जिल्ह्यासह परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी रस्ते, पूल आणि वाहतूक व्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. अशा परिस्थितीत लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षिततेचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे. वारीच्या नियोजनात प्रशासनाकडून दरवर्षी मोठमोठे दावे केले जातात; प्रत्यक्षात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत अनेक ठिकाणी अपुरी व्यवस्था, विस्कळीत वाहतूक, चिखलमय मार्ग आणि मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत आहे. नैसर्गिक आपत्ती टाळता येत नसली, तरी तिचा परिणाम कमी करण्यासाठी आवश्यक नियोजन, समन्वय आणि तत्परता अपेक्षित असते. वारी ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असल्याने वारकऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीसुविधा ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून, त्यांची प्राथमिकताही असली पाहिजे. येणाऱ्या काळात पालखी मार्ग अधिक सोयी-सुविधायुक्त करण्याची आवश्यकता आहे. कारण वारी हे महाराष्ट्राचे आध्यात्मिक आणि सामाजिक संचित आहे आणि त्याच संचिताच्या भरवशावर महाराष्ट्राने आतापर्यंतचा प्रवास केलेला आहे.
आषाढाची चाहूल लागते, आभाळ भरून येते, काळ्या ढगांची गर्दी होते आणि पावसाच्या सरी वावरातल्या ढेकळांना चिंब भिजवू लागतात, तेव्हा वारकऱ्यांच्या मनाला पंढरीच्या वाटेची ओढ लागते. यंदा मात्र पावसाच्या कहराने जनजीवन विस्कळीत झाले. देहू आणि आळंदीत कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने वारकऱ्यांची वाट खडतर केली. तरीही विठुरायाच्या दर्शनाची आस उराशी बाळगून वारकऱ्यांची पावले पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत. ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता सुरू असलेल्या भक्तिप्रवासातूनच वारीचा खरा अर्थ उमगायला लागतो. पाऊस आणि वारीचे नाते तसे जुनेच. पाऊस जसा शेतीला नवजीवन देतो, तशीच वारी माणसांच्या मनाला नवी ऊर्जा आणि सकारात्मक विचार देते. वारीत हजारो लोक एकत्र चालतात, एकमेकांना साथ देतात आणि समतेचा, सहकार्याचा संदेश जगतात. त्यामुळे पाऊस आणि वारी यांचे नाते हे निसर्ग, श्रद्धा आणि माणुसकीला जोडणारे आहे. हे नाते आपल्याला एकत्र जगण्याची, संकटातही आशावादी राहण्याची आणि समाजाशी जोडून राहण्याची प्रेरणा देत आले आहे. पाऊस म्हणजे सृष्टीचे पुनरुज्जीवन तर वारी म्हणजे समाजमनाचे पुनरुज्जीवन. उन्हाने तापलेली जमीन पावसाची वाट पाहते, तसेच दैनंदिन जीवनातील संघर्ष, ताणतणाव आणि स्पर्धेने थकलेले मन वारीतील सामूहिक आनंदाची वाट पाहत असते. पावसाचे थेंब जमिनीची तहान भागवतात, तर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर मनातील कोरडेपणा दूर करतो. पावसाच्या सरी आणि वारकऱ्यांची पावले एकाच वेळी या मातीत सृजनाच्या पाऊलखुणा उमटवतात, तेव्हा निसर्ग आणि संस्कृतीचा अद्भुत संगम घडताना दिसतो. वारीत लाखो माणसे एका ध्येयाने, एका लयीत आणि एका भावनेने चालतात. आधुनिक काळात माणसामाणसांतील अंतर वाढत असताना वारी मात्र माणसांना जवळ आणते. जात, धर्म, भाषा, आर्थिक स्थिती, सामाजिक प्रतिष्ठा अशा अनेक भिंती समाजात उभ्या राहत असताना वारी त्या भिंती सहजपणे ओलांडते. येथे श्रीमंत-गरीब असा भेद नसतो. अधिकारी आणि सामान्य माणूस एकाच रस्त्यावर चालतो. शेतकरी, कामगार, व्यापारी, नोकरदार, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक अशा सर्वांना सामावून घेणारा हा लोकप्रवाह समतेच्या परंपरेचे दर्शन घडविणारा आहे.
कोणत्याही परिस्थितीत वारीचे हे माहात्म्य टिकले पाहिजे आणि तिच्या सातत्यात खोळंबा येऊ नये. आज हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान, शहरीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास आणि सामाजिक अस्वस्थता अशी अनेक आव्हाने उभी आहेत. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ अशा टोकाच्या परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. या बदलत्या वास्तवात पाऊस आणि वारी या दोन्हींकडे नव्या जाणिवेतून पाहण्याची गरज आहे. निसर्गाशी असलेले नाते तुटले तर मानवी जीवनाचा समतोल बिघडतो आणि समाजाशी असलेली नाळ तुटली तर माणसाच्या अस्तित्वातील संवेदनशीलता हरवते. पाऊस निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देतो, तर वारी समाजाशी असलेल्या बांधिलकीचे भान जागवते. वारीच्या वाटेवर पडणारा पाऊस वारकऱ्यांच्या निष्ठेची परीक्षा पाहतो. ओले कपडे, चिखलाने माखलेले रस्ते, थकलेले शरीर आणि प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करीत पुढे जाणारी पावले जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान सांगून जातात. परिस्थिती नेहमी अनुकूल असेलच असे नाही; मात्र ध्येय स्पष्ट असेल; सोबत विश्वासाची माणसे असतील आणि मनात आशा जिवंत असेल, तर खडतर वाटही पार करता येते. म्हणूनच आषाढातील पाऊस आणि पंढरीची वारी हे दोन्ही प्रवाह आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. एका प्रवाहातून धरतीची सर्जनशीलता फुलते तर दुसऱ्या प्रवाहातून समाजाची संवेदनशीलता जागी होते. एक मातीला अंकुरण्याचे बळ देतो, तर दुसरा माणसाला माणूस म्हणून जगण्याची दिशा देतो.wind and rain आभाळातून बरसणाऱ्या सरी आणि मुखातून उमटणारा विठ्ठलनामाचा संगम होत राहील, तोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीतील आशा, श्रद्धा आणि माणुसकीचा ओलावा कधीच आटणार नाही. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेला वारकरी शेकडो किलोमीटर चालतो. एवढा प्रदीर्घ प्रवास तो कशासाठी करतो? मंदिरातील मूर्तीचे काही क्षण दर्शन घेण्यासाठी? तसे असते तर आधुनिक वाहतुकीच्या साधनांनी काही तासांत पंढरपूर गाठणे सहज शक्य आहे. तरीही लाखो माणसे पायी चालण्याचा मार्ग निवडतात. कारण वारीचे खरे मर्म मुक्कामापेक्षा प्रवासात आहे. विठ्ठलाच्या दर्शनापेक्षा विठ्ठलाच्या दिशेने चालत राहण्यात आहे. आज माणसे प्रचंड वेगाने धावत आहेत. त्यांच्याकडे पैसा आहे, साधने आहेत, तंत्रज्ञान आहे; पण वेळ नाही. संवादाची असंख्य माध्यमे आहेत; पण मन मोकळे करण्यासाठी माणूस नाही. सोशल मीडियावर हजारो मित्र आहेत; पण संकटाच्या काळात खांद्यावर हात ठेवणारा मित्र शोधावा लागतो. मोठी घरे आहेत; पण कुटुंबे लहान होत आहेत. जग जवळ आले आहे; पण माणसे एकमेकांपासून दूर जात आहेत. अशा काळात लाखो अनोळखी माणसांना एका वाटेवर आणणारी वारी अधिक महत्त्वाची ठरते. पायी चालणे हा वारीचा आत्मा आहे. आजच्या काळात माणसाचे श्रम कमी करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध झाली आहेत. शरीराचे कष्ट कमी झाले; पण मनाचा थकवा मात्र वाढत गेला. वारीत मात्र माणूस स्वतःच्या पायांवर आणि स्वतःच्या जिद्दीवर विश्वास ठेवतो. प्रत्येक पावलागणिक अंतर कमी होत जाते. शरीर थकते, पाय दुखतात; पण मन अधिक मजबूत होत जाते. संकटांवर मात करण्यासाठी चमत्काराची गरज नसते, तर सातत्याने एकेक पाऊल पुढे टाकण्याची तयारी लागते, हे वारी सहज शिकवते. म्हणूनच सभोवताली पावसाचे तांडव सुरू असले, तरी वारकऱ्यांची पावले थांबत नाहीत, पुढे चालत राहतात. वारी ही महाराष्ट्राच्या सामूहिक चेतनेची जिवंत अभिव्यक्ती आहे. बदलत्या काळातही ती माणसाला निसर्गाशी, समाजाशी आणि स्वतःच्या अंतर्मनाशी जोडण्याचे काम करते. पावसाच्या आव्हानांमध्येही वारकऱ्यांचा प्रवास आपल्याला धैर्य, शिस्त आणि सहनशीलतेची शिकवण देतो. या परंपरेचे महत्त्व तिच्या अधिष्ठानी असलेल्या मूल्यांमध्ये आहे. परस्परांना आधार देणे, संकटांमध्ये संयम राखणे आणि सामूहिक हिताचा विचार करणे हीच वारीची खरी शिकवण आहे. वारीचा वारसा जपताना तिच्यातील मानवी मूल्ये पुढील पिढ्यांपर्यंत आपल्याला पोहोचवावे लागतील. पावसापासून नियमितता व सातत्य शिकावे लागेल आणि वारीतून सामाजिक सौहार्दाची ताकद समजून घ्यावी लागेल. हे शिकायचे ते यासाठी की, पावसाचे सातत्य राहण्यासाठी आणि वारीची निरंतरता टिकण्यासाठी आपल्या सर्वांना झटावे लागणार आहे.