मुंबई,
Action taken against K. Rustom Ice Cream Parlour मुंबईतील चर्चगेट परिसरात अनेक दशकांपासून लोकप्रिय असलेल्या के. रुस्तम अँड कंपनी या प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे आढळल्यानंतर या आस्थापनेचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. एफडीएच्या तपासणीदरम्यान पार्लरमध्ये उंदीर, घरमाश्या, मुदत संपलेले खाद्यपदार्थ तसेच अन्न साठवण आणि हाताळणीतील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्या. याशिवाय कोल्ड चेन व्यवस्थापनातील अनियमितता आणि आवश्यक अन्न सुरक्षा नोंदींचा अभावही निदर्शनास आला. या सर्व बाबी अन्न सुरक्षा आणि स्वच्छता मानकांचे गंभीर उल्लंघन असल्याचे एफडीएने नमूद केले आहे. अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या सर्व त्रुटी दूर करून अन्न सुरक्षा नियमांचे संपूर्ण पालन केल्यानंतरच या आस्थापनेचा परवाना पुन्हा बहाल केला जाईल.
१९५३ साली खोदाबक्ष रुस्तम इराणी यांनी सुरू केलेले के. रुस्तम अँड कंपनी हे मुंबईतील सर्वात जुन्या आणि प्रसिद्ध आईस्क्रीम पार्लरपैकी एक मानले जाते. वेफर्समध्ये दिल्या जाणाऱ्या खास आईस्क्रीम सँडविचमुळे हे ठिकाण मुंबईकरांसह पर्यटकांमध्येही विशेष लोकप्रिय आहे. राज्यभर राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेदरम्यान एफडीएने १६ हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य आस्थापनांची पाहणी केली. त्यापैकी १० आस्थापनांना सुधारणा नोटिसा देण्यात आल्या, तर तीन आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले. के. रुस्तम व्यतिरिक्त धुळे येथील हॉटेल पाटीलवाडा याचा आवश्यक अन्न व्यवसाय परवान्याविना व्यवसाय सुरू ठेवल्यामुळे परवाना निलंबित करण्यात आला. तसेच नागपूरमधील श्री हिरा स्वीट्स प्रायव्हेट लिमिटेड येथे अन्न तयार करण्याच्या जागेजवळ मृत उंदीर आढळल्याने त्या आस्थापनेवरही हीच कारवाई करण्यात आली. दरम्यान, एफडीएच्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सुमारे ९.६ लाख रुपये किमतीचा प्रतिबंधित पान मसाला आणि गुटखा जप्त करण्यात आला. या प्रकरणात गुन्हा दाखल करून एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तसेच अन्न सुरक्षा कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या पाच आस्थापनांतून सुमारे ७.५ लाख रुपये किमतीचे दूध, दुग्धजन्य पदार्थ, गूळ आणि इतर खाद्यपदार्थही जप्त करण्यात आले आहेत.