Bus-trailer accident साकोली येथील लाखांदूर रोड वळणावरील माकोडे पेट्रोल पंपासमोर बस आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघातात चालकासह पाच प्रवाशी गंभीर जखमी झाले. प्राथमिक उपचार करून नंतर त्यांना भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले. आज 9 रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास साकोली बसस्थानकावरून नवेगावबांधकडे जाण्यासाठी एसटी बस क्रमांक एम ०७/सी ९५४३ ही काही प्रवास घेऊन निघाली. दुपारी ३.४५ वाजता लाखांदूरकडून साकोलीकडे येणाऱ्या सीजी ०४/एनझेड २८०७ क्रमांकाच्या ट्रेलरने वळण मार्गांवर धडक दिली. ही धडक ऐवढी जोराची होतो की, बसचा समोरून चुराडा झाला. या अपघातात बस चालक श्यामराव धनपटे (५६) आणि वाहक राकेश दाद्देमल (४०) हे गंभीर जखमी झाले.
याशिवाय बसमधील जयमाला लांडगे (५०) रा.सावळ/महागाव, जयश्री केंद्रे (३३) व सत्यभामा रंगारी (६५) दोघेही रा.सानगडी, नेहा गोटेफोडे (१९) व गुंजन डुंभारे (१९) दोघेही रा.सासरा हे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर बस चालक शामराव धनपटे, वाहक राकेश दाद्देमल आणि प्रवासी जयमाला लांडगे, जयश्री केद्रे, नेहा गोटेफोडे व सत्यभामा रंगारी यांना गंभीर जखमी अवस्थेत भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाकडून सर्व जखमी प्रवाशांना प्राथमिक उपचारासाठी १ हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली. पुढील कारवाई साकोली पोलिस करीत आहेत.