अनिल कांबळे
नागपूर,
share market प्रॉपर्टी आणि शेअर बाजारात गुंतवणूक करून दरमहा १० टक्के परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका व्यावसायिकाची सुमारे ३० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी पाच जणांविरुद्ध फसवणूक, विश्वासघात आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवन शेषराव येडे (पारडी) हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. वर्ष २०२३ मध्ये क्रिकेट खेळताना त्यांची ओळख मुख्य आरोपी आयुष चतुर्वेदी याच्याशी झाली. त्यानंतर आयुष आणि त्याचे वडील विजय चतुर्वेदी यांनी आपण प्रॉपर्टी, शेअर बाजार आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये काम करत असून, गुंतवणुकीवर दरमहा १० टक्क्यांपर्यंत परतावा मिळवून देऊ शकतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला.
तक्रारीनुसार, नोव्हेंबर २०२३ रोजी आयुष, विजय, कुसुम चतुर्वेदी आणि अशंद चतुर्वेदी हे फिर्यादीच्या कार्यालयात आले. त्यांनी विश्वासात घेऊन गुंतवणुकीसाठी ५० लाख रुपये स्वीकारले. सुरुवातीच्या काळात ठरल्याप्रमाणे काही रक्कम परत दिल्यामुळे फिर्यादीचा विश्वास अधिकच दृढ झाला. याच दरम्यान पाचवा आरोपी विनीत चतुर्वेदी याने १० लाख रुपयांचा धनादेश दिला होता. तो धनादेशही बँकेत वटला. मात्र, १२ जानेवारी २०२४ नंतर आरोपींनी कोणतेही पैसे देणे बंद केले. तक्रारीनुसार, आरोपींनी एकूण १९ लाख ९१ हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित ३० लाख ९ हजार रुपये तसेच आश्वासन दिलेला नफा दिला नाही. वारंवार मागणी करूनही आरोपी टाळाटाळ करू लागल्याने अखेर फिर्यादीने नंदनवन पोलिसांत तक्रार दाखल केली. प्राथमिक चौकशीनंतर पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील फसवणूक, विश्वासघात आणि सामूहिक कटाशी संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस बँकेतील आर्थिक व्यवहार, गुंतवणुकीशी संबंधित कागदपत्रे, धनादेश आणि अन्य आर्थिक नोंदींची तपासणी करत असून, या प्रकरणात आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या कथित गुंतवणूक घोटाळ्याचा सखोल तपास सुरू आहे.