वाशीम,
washim विद्यार्थ्यांच्या विविध शैक्षणिक प्रश्नासह स्पर्धा परीक्षामधील पारदर्शकतेच्या मागण्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने देशभर ‘छात्रों की गुंज’ आंदोलन राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत वाशीम जिल्ह्यातही विविध शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजू चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
चौधरी म्हणाले, एमपीएससीसह इतर स्पर्धा परीक्षा ऑनलाइन न घेता ऑफलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात, तसेच परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता कायम ठेवावी, ही आंदोलनाची प्रमुख मागणी आहे. वारंवार होणार्या पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, त्यामुळे अनेकांचे शैक्षणिक व करिअरचे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. या आंदोलना अंतर्गत जिल्हा काँग्रेस, युवक काँग्रेस आणि राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या (एनएसयूआय) पदाधिकार्यांकडून शाळा, महाविद्यालये, कोचिंग लासेस, परीक्षा केंद्रे आणि करिअर अकादमींना भेटी देण्यात येणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत केंद्र व राज्य सरकारच्या शिक्षण धोरणा विरोधात जनजागृती केली जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अॅड. दिलीप सरनाईक, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव सरनाईक, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष शिवम वाघ, नगरसेवक राजू वानखेडे, किसनराव मस्के, समाधान माने, परसराम भोयर, उज्ज्वल देशमुख, प्रा. दादाराव देशमुख, इस्माईल पठाण, महादेव सोळंके, गजानन गोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.