नाशिक,
Consumer Commission's order to Moushumi Chatterjee ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री मौशमी चॅटर्जी यांना नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने मोठा दणका दिला आहे. कार्यक्रमासाठी मानधन, विमान प्रवास आणि पंचतारांकित हॉटेलची सुविधा स्वीकारूनही नियोजित कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याप्रकरणी आयोगाने त्यांना मानधन परत करण्यासह तक्रारदाराला मानसिक त्रासाची भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही तक्रार नाशिकच्या ७४ वर्षीय निवृत्त शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुणा वानखेडे यांनी दाखल केली होती.


डॉ. अरुणा वानखेडे यांनी त्यांच्या वैद्यकीय तुकडीच्या ५५ व्या स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन १८ नोव्हेंबर २०२३ रोजी गोव्यातील एका रिसॉर्टमध्ये केले होते. या कार्यक्रमासाठी मौशमी चॅटर्जी यांना प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. एका महिला एजंटमार्फत त्यांच्याशी संपर्क साधून कार्यक्रमासाठी ३ लाख रुपयांचे मानधन निश्चित करण्यात आले. त्यापैकी २ लाख रुपये आरटीजीएसद्वारे देण्यात आले, तर उर्वरित १ लाख रुपये गोव्यात पोहोचल्यानंतर रोख स्वरूपात देण्यात आले. तसेच अभिनेत्री आणि त्यांच्या सहाय्यकासाठी मुंबई-गोवा विमान प्रवासाची तिकिटे आणि पंचतारांकित हॉटेलमधील निवासाची व्यवस्था आयोजकांनी केली होती.
१७ नोव्हेंबर २०२३ रोजी मौशमी चॅटर्जी गोव्यात पोहोचल्या. विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यात आले आणि उर्वरित मानधनही त्यांना देण्यात आले. मात्र, डॉ. अरुणा वानखेडे यांना गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे त्या स्वतः स्वागतासाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत. याच कारणाचा आणि करारातील अटींचे उल्लंघन झाल्याचा दावा करत मौशमी चॅटर्जी यांनी दुसऱ्याच दिवशी कार्यक्रमाला उपस्थित न राहता मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. प्रमुख पाहुण्या अनुपस्थित राहिल्याने आयोजकांची मोठी गैरसोय झाली. त्यानंतर ई-मेलद्वारे मानधन परत करण्याची मागणी करूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने डॉ. अरुणा वानखेडे यांनी नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेतली. सुनावणीदरम्यान आयोगाच्या अध्यक्षा शिल्पा एस. डोळहारकर यांनी अभिनेत्रीच्या वतीने मांडण्यात आलेला "हा वैयक्तिक सेवा करार असल्याने ग्राहक संरक्षण कायदा लागू होत नाही" हा युक्तिवाद फेटाळून लावला.