शूटिंग सुरू आहे...चित्रपट येणारच

रुपाली चाकणकरांच्या २५ कोटींच्या मानहानी दाव्याला दीपाली सय्यद यांचे प्रत्युत्तर

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
deepali sayyed  नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित कारनाम्यांमुळे काही दिवसांपूर्वी राज्यभर खळबळ उडाली होती. त्यांच्या खासगी आयुष्यासह विविध राजकीय व्यक्तींशी असलेले संबंधही चर्चेत आले होते. याच काळात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबतचा एक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दरम्यान, अशोक खरात यांच्या आयुष्यावर आधारित 'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत अभिनेत्री दीपाली सय्यद झळकणार आहेत. मात्र, याबाबत माहिती समोर आल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. त्यानंतर आता दीपाली सय्यद यांनी चाकणकर यांनी दाखल केलेल्या २५ कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्याला सडेतोड उत्तर दिले आहे.
 

deepali sayyed replies to rupali chakankar rs 25 crore defamation case over maharashtra epstein files 
रुपाली चाकणकर यांनी दीपाली सय्यद यांच्याविरोधात २५ कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला असून, केवळ त्यांच्यावरच नव्हे तर अनेक व्यक्तींवर अशा प्रकारचे दावे करण्यात आल्याचा दावा दीपाली सय्यद यांनी केला आहे. या प्रकरणात त्यांनी न्यायालयात उत्तर दाखल करत चाकणकर यांच्या आरोपांना स्पष्ट प्रत्युत्तर दिले आहे.
दीपाली म्हणाल्या काय?
“त्यांना असं वाटतं की मी त्यांच्या नावाचा वापर करून त्यांचे व्यक्तिमहत्त्व खराब करण्याचा प्रयत्न केला आहे. पण चित्रपटात जे आहे ते आहे, जे नाही ते मी कधीही बोलले नाही. मी कोर्टात योग्य त्या पद्धतीने उत्तर देत आहे,” असे दीपाली सय्यद यांनी स्पष्ट केले. दीपाली यांचे म्हणणं आहे की सिनेमात चाकणकरांची मानहानी होईल असं काहीच नाहीये. रूपाली चाकणकर यांनी केवळ दीपालींनाच नव्हे तर चित्रपटाशी संबंधित सर्व लोकांना आणि अनेक चॅनेल्सना नोटीस पाठवल्याचेही दीपाली यांनी सांगितले. “अंजलीताई, सुषमा अंधारे, रूपाली ठोंबरे यांच्यासह एकूण ४० लोकांची यादी आहे,” असे त्यांनी नमूद केले.
चित्रपट थांबणार नाही
रूपाली चाकणकर यांच्या नोटिशी आणि दाव्यांमुळे चित्रपट थांबणार नसल्याचे दीपाली यांनी ठामपणे सांगितले. “शूटिंग सुरू आहे. ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. २ ऑक्टोबरला हा चित्रपट रिलीज होणारच,” असे त्यांनी जाहीर केले. दीपाली पुढे म्हणाल्या, “मी जर पदावर असते तर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा दिली असती. आम्ही कोणाचीही बदनामी करत नाही.हिंदुस्तानी भाऊबाबत बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या, “सगळे आता लाईनमध्ये आले आहेत. शिंदे साहेबांचे नेतृत्व सर्वांना आवडते. ते सर्वांचे बोलणे ऐकून घेतात. त्यांच्यासमोर कोणाचीही झोली खाली पडत नाही.”