धानोरा - अनसिंग मार्गाचे महामार्गात रूपांतर करण्याची गरज

वर्षानुवर्षांच्या मागणीकडे दुर्लक्ष

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
वाशीम,
highway वाशीम जिल्ह्यातील धानोरा ते अनसिंग हा महत्त्वाचा मार्ग आजही एकेरी रस्त्याच्या स्वरूपातच असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
 
 

dhanora to ansing road should be upgraded to highway demand grows in washim 
 
जिल्ह्यातील अनेक प्रमुख मार्गांचे रुंदीकरण करून त्यांना महामार्गाचा दर्जा देण्यात आला असताना विदर्भ आणि मराठवाडा यांना जोडणार्‍या या महत्त्वपूर्ण मार्गाकडे मात्र, शासन आणि लोकप्रतिनिधींकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. धानोरा ते अनसिंग हा मार्ग केवळ दोन गावांना जोडणारा नसून वाशीम जिल्ह्यातील सुमारे ५० हून अधिक ग्रामीण भागासाठी जीवनवाहिनी ठरू शकतो. या मार्गाचे महामार्गात रूपांतर झाल्यास परिसरातील वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान होईल, तसेच या भागाच्या आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळू शकते. मात्र अनेक वर्षांपासून ही मागणी प्रलंबित असून त्यासाठी कोणतेही ठोस प्रयत्न झाल्याचे दिसून येत नाही.
अमरावती—- नांदेड या प्रमुख मार्गावरून दररोज हजारो लहान -मोठ्या वाहनांची ये - जा सुरू असते. धानोरा—अनसिंग मार्गाचे चौपदरीकरण अथवा महामार्गात रूपांतर झाल्यास वाहनचालकांना सुमारे ३० किलोमीटर अंतराची बचत होऊ शकते. त्यामुळे नागपूर, अमरावती, नांदेड, हिंगोली, परभणी तसेच हैदराबादकडे जाणार्‍या वाहनांसाठी हा अत्यंत सोयीस्कर आणि कमी अंतराचा पर्याय ठरू शकतो.
विशेष म्हणजे या मार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेली अनेक गावे आजही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून काही प्रमाणात दूर आहेत. महामार्ग झाल्यास या गावांमध्ये व्यापार, उद्योग, शिक्षण, आरोग्य सुविधा आणि रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होईल. जमिनींचे मूल्य वाढेल, गुंतवणूक आकर्षित होईल आणि ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असा विश्वास स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. खासदार, आमदार तसेच संबंधित जनप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करून या मार्गाचा राष्ट्रीय अथवा राज्य महामार्ग योजनेत समावेश करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत या दिशेने कोणतीही ठोस हालचाल दिसून आलेली नाही.
विशेष बाब म्हणजे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री पद विदर्भातील ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याकडे आहे. त्यामुळे योग्य पाठपुरावा आणि प्रस्ताव सादर झाल्यास या मार्गाच्या विकासासाठी सकारात्मक निर्णय मिळण्याची शयता असल्याचे जाणकारांचे मत आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. धानोरा - अनसिंग मार्गाचे महामार्गात रूपांतर ही केवळ वाहतुकीची गरज नसून संपूर्ण परिसराच्या विकासाची गुरुकिल्ली ठरू शकते. त्यामुळे शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.