हिंगोली, नांदेड, परभणीत भूकंपाने हादरले!

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
हिंगोली,
Earthquake tremors in Marathwada मराठवाड्यातील हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये बुधवारी मध्यरात्रीनंतर भूकंपाचे सलग धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पहिला धक्का रात्री १ वाजून ३७ मिनिटांनी बसला असून त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.४ इतकी नोंदवण्यात आली. सर्वप्रथम हिंगोली जिल्ह्यातील शिंदे पांगरा परिसरात भूकंपाची तीव्र जाणीव झाली. गाढ झोपेत असलेले अनेक नागरिक धक्क्यांमुळे दचकून घराबाहेर पडले आणि सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. भूकंपाचे हादरे नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर आणि निळा रोड परिसरातही जाणवले. नांदेडमध्ये रिश्टर स्केलवर ४.२ तीव्रतेचा सौम्य धक्का नोंदवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
 
स्वईर
 
प्राथमिक माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरात होते. मध्यरात्री १.३७ ते ३.२३ या कालावधीत एकूण चार वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या दोन तासांच्या कालावधीत सलग चार धक्के बसल्याने हा प्रकार स्थानिकांसाठी अत्यंत धक्कादायक ठरला आहे.गेल्या सहा वर्षांत हिंगोली जिल्ह्यात ३७ पेक्षा अधिक वेळा भूकंपाचे धक्के नोंदवले गेले आहेत. विशेषतः औंढा नागनाथ, कळमनुरी आणि वसमत या तालुक्यांमध्ये जमिनीतून गूढ आवाज येणे आणि सौम्य भूकंपाचे धक्के जाणवण्याच्या घटना वारंवार घडत असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवत नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि केवळ अधिकृत माहितीवरच भरोसा ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच घाबरून न जाता सतर्क राहावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.