हातगाडी व फेरीवाल्यांवर कठोर कारवाईची नागरिकांची मागणी
उमरखेड,
Encroachment and jarring noise शहरातील प्रमुख चौक, अंतर्गत रस्ते आणि आठवडी बाजार परिसरात हातगाडी, फळ व भाजी विक्रेते तसेच फेरीवाले ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वाहनांवर व हातगाड्यांवर कर्णकर्कश आवाजाचे भोंगे लावून दिवसभर रेकॉर्ड केलेल्या जाहिराती वाजवत असल्याने ध्वनीप्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या सततच्या गोंगाटामुळे नागरिक, पादचारी, विद्यार्थी, स्थानिक दुकानदार तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शहरातील अनेक ठिकाणी फेरीवाल्यांकडून रस्त्यावर अतिक्रमण करून व्यवसाय केला जात असल्याने वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्यातच मोठ्या आवाजात भोंगे वाजविल्यामुळे वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि निवासी भागांमध्येही या कर्णकर्कश आवाजामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येत असून विविध परिसरांतील नागरिक त्रस्त झाले आहेत.
नागरिकांच्या मते, काही फेरीवाले कोणत्याही नियमांचे पालन न करता सार्वजनिक रस्त्यांवर अतिक्रमण करीत व्यवसाय करत आहेत. कारवाईची भीती नसल्याने हे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत आहे. स्थानिक दुकानदारांनाही या अनधिकृत व्यवसायामुळे आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी नगर परिषद व पोलिस प्रशासनाने संयुक्त मोहीम राबवून रस्त्यांवरील अतिक्रमण हटवावे, कर्णकर्कश आवाजाचे भोंगे जप्त करावे. तसेच ध्वनीप्रदूषण करणाèया व्यावसायींवर दंडात्मक कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. शहरातील वाहतूक, सार्वजनिक शांतता आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.