विश्वचषकात पुन्हा युरोपचीच सरशी; उपांत्यपूर्व फेरीत ६ संघ

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
फ्लोरिडा,
Europe Dominates the World Cup फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धा आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, ४८ संघांमधून केवळ आठ संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. या आठ संघांमध्ये युरोपचे तब्बल सहा संघ असून, दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेतील प्रत्येकी एक संघ स्पर्धेत कायम आहे. त्यामुळे यंदाही विश्वविजेतेपदाची शर्यत प्रामुख्याने युरोप आणि दक्षिण अमेरिका यांच्याभोवतीच फिरताना दिसत आहे.१९३० पासून झालेल्या २२ फिफा विश्वचषक स्पर्धांचा इतिहास पाहिला तर युरोपने १२ वेळा, तर दक्षिण अमेरिकेने १० वेळा विजेतेपद पटकावले आहे. अद्याप जगातील इतर कोणत्याही खंडातील संघाला विश्वविजेतेपद मिळवता आलेले नाही. यंदाच्या उपांत्यपूर्व फेरीतील चित्रही या परंपरेलाच पुष्टी देणारे ठरत आहे.
 
 
 
fdt5757
दरम्यान, १६ संघांच्या फेरीत इजिप्तवर रोमांचक विजय मिळवल्यानंतर अर्जेंटिना संघ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचवेळी अर्जेंटिना फुटबॉल असोसिएशन (AFA) कायदेशीर अडचणीत सापडल्याची माहिती समोर आली असून, फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (FBI) या प्रकरणाचा तपास करत असल्याचे वृत्त आहे.यंदाच्या विश्वचषकाचे सह-यजमान असलेल्या अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या तिन्ही देशांकडून घरच्या मैदानावर दमदार कामगिरीची अपेक्षा होती. गट फेरी आणि ३२ संघांच्या फेरीत या तिन्ही संघांनी मिळून ९ विजय, २ बरोबरी आणि १ पराभवासह २० गोल नोंदवत प्रभावी कामगिरी केली होती. मात्र, १६ संघांच्या फेरीत तिन्ही यजमान संघांचे आव्हान संपुष्टात आले. विशेषतः बेल्जियमकडून अमेरिकेला ४-१ असा पराभव स्वीकारावा लागल्याने उत्तर अमेरिकन फुटबॉलच्या मर्यादा पुन्हा अधोरेखित झाल्या.
 
 
पराभवानंतर अमेरिकेचा स्टार खेळाडू ख्रिश्चन पुलिसिक म्हणाला, "आम्हाला अजून मोठी झेप घ्यायची आहे. जगातील सर्वोत्तम संघांना पराभूत करण्याचे आमचे लक्ष्य आहे, मात्र आम्ही अजून त्या पातळीपर्यंत पोहोचलेलो नाही."युरोपच्या यशामागे नव्या संघांची दमदार कामगिरीही महत्त्वाची ठरली आहे. स्टार खेळाडू अर्लिंग हालंडच्या नेतृत्वाखाली नॉर्वेने बलाढ्य ब्राझीलला पराभूत करत प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या यशाबद्दल हालंड म्हणाला, "आम्ही इतकी मोठी मजल मारू, असे मला वाटले नव्हते. माझा अंदाज चुकीचा ठरला, पण तो आमच्यासाठी सकारात्मक ठरला." उपांत्यपूर्व फेरीत आता युरोपचे सहा, दक्षिण अमेरिकेचा एक आणि आफ्रिकेचा मोरोक्को असा संघ उरला आहे. त्यामुळे यंदाही विश्वविजेतेपद युरोप किंवा दक्षिण अमेरिकेतील संघाकडे जाण्याची शक्यता अधिक असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, इतिहास बदलण्याचे आव्हान मोरोक्कोसमोर असून, अंतिम फेरीकडे वाटचाल करणाऱ्या या आठ संघांपैकी कोण बाजी मारतो, याकडे आता फुटबॉलप्रेमींचे लक्ष लागले आहे.