तेहरान,
final-farewell-to-khamenei : इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा दफनविधी गुरुवारी मशहद येथील इमाम रझा दर्ग्यात झाला. यावेळी लाखो नागरिकांची उपस्थिती होती. अखेरचा निरोप देण्यासाठी लाखो नागरिकांचा जनसागर लोटला होता. काळे कपडे घालून छाती बडवून शोक व्यक्त करणाऱ्या गर्दीने अमेरिका आणि इस्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
दफनविधीपूर्वी खामेनेई यांचे पार्थिव इराकचे पवित्र शहर नजफ येथे आणले. यावेळी इमाम अली यांच्या दर्ग्याजवळ मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर शवपेटी नजफहून कर्बला येथे रस्त्याने आणण्यात आली. यावेळी लोकांनी इराणी झेंडे फडकवत खामेनेई यांचे फोटो हातात धरले होते. मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथकेही उपस्थित होती. कर्बला येथून मशहद येथील इमाम रझा दर्ग्यात त्यांचे पार्थिव आणण्यात आले आणि तिथे त्यांचा अन्त्यविधी पार पडला. अन्त्यविधी सोहळ्यास ३ जुलैपासून सुरुवात झाली. शंभरपेक्षा अधिक देशांच्या प्रतिनिधींची अन्त्यसंस्कार सोहळ्यात उपस्थिती होती. अन्त्ययात्रा इराण आणि शिया समुदायासाठी विशेष महत्त्व असलेल्या धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांमधून गेली. या प्रवासाला तेहरानमधून सुरुवात झाली, इराणच्या पवित्र शहरांना भेट दिल्यानंतर इराकमधील नजफ आणि कर्बला येथे हा प्रवास झाला. त्यानंतर शवपेटी इराणला परत आणली आणिन गुरुवारी त्यांच्या मूळ गावी मशहदमध्ये त्यांच्यावर अन्त्यसंस्कार करण्यात आले.