सावधान! खऱ्या सौंदर्याचे गमक शोधाल तर किडनी गमवाल!

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
गोरे होण्याच्या नादात नागपूरमध्ये १८ महिलांना फटका;
प्रतिबंधित क्रीममुळे खळबळ
पारा आणि शिसे ७५२ पट जास्त
हिवाळी अधिवेशनातही गाजला होता विषय
 
नागपूर, 
'Gori Beauty Cream' गोरे होण्याच्या इच्छेपोटी वापरलेले एक प्रतिबंधित सौंदर्य प्रसाधन क्रीम १८ महिलांसाठी जीवघेणे ठरले आहे. गेल्या दोन वर्षांत नागपूरमध्ये १८ महिलांच्या किडनी निकामी होण्यामागे ‘गोरी ब्युटी क्रीम’ नावाच्या उत्पादनाचा संबंध आढळून आला आहे. हे उत्पादन पाकिस्तानात तयार केले जात असल्याचे सांगितले जाते. हा विषय नागपुरातील गेल्या हिवाळी अधिवेशनात गाजला होता. या क्रीमवर बंदी घालण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती. काय आढळले चाचणीत?
 
 
patil
 
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या तपासणीत तीन उत्पादनांमध्ये गंभीर अनियमितता आढळली. ‘गोरी ब्युटी क्रीम' सोबतच ‘फेस फ्रेश गोल्ड' आणि ‘गोल्डन स्टार ब्युटी क्रीम' यांच्यावरही तत्काळ बंदी घालण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार या क्रीममध्ये पारा आणि शिसे या विषारी जड धातूंचे प्रमाण कायदेशीर मर्यादेपेक्षा ७५२ पट जास्त होते.
 
 
किडनी कशी निकामी होते?
आरोग्यतज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार पारा त्वचेद्वारे शरीरात शोषला जातो आणि रक्तामार्फत थेट किडनीमध्ये जमा होतो. त्यामुळे किडनीतील लहान गाळण यंत्रणा खराब होते. याला पडदा किडनी रोग असे म्हणतात. यामुळे शरीरातील आवश्यक प्रथिने लघवीवाटे बाहेर पडतात आणि तीव्र सूज व अशक्तपणा येतो. नागपूरच्या विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आलेल्या महिलांचा वैद्यकीय इतिहास तपासला असता, त्या सर्व जणी गेल्या अनेक महिन्यांपासून हेच क्रीम वापरत असल्याचे समोर आले.
 
मुंबईपर्यंत पोहोचले पडसाद
हे प्रकरण मुंबईपर्यंत पोहोचले आहे. चेंबूर येथील एका सौंदर्यप्रसाधन विक्रेत्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. केंद्र सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर घातलेल्या बंदीचे उल्लंघन करून ‘गोरी ब्युटी क्रीम’चा मोठ्या प्रमाणात साठा करून विक्री केल्याचा आरोप आहे. हे क्रीम ‘मीशो’सारख्या ऑनलाईन विक्री संकेतस्थळांवर आणि अनेक अनधिकृत समाजमाध्यम पानांवरून बेकायदेशीरपणे विकले जात होते.
 
 

गोरेपणा म्हणजे सौंदर्य नसते. प्रत्येकाची त्वचा नैसर्गिक असते. काही दिवसांत गोरे करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही क्रीमवर विश्वास ठेवू नका. गोरी आणि चमकदार त्वचेच्या मोहापायी अनेक जण ऑनलाईन किंवा सोशल माध्यमांवर विकल्या जाणाऱ्या क्रीम्स वापरतात. मात्र ‘गोरी ब्युटी क्रीम’ आणि ‘फेस फ्रेश गोल्ड’ या दोन क्रीम्समध्ये धोकादायक प्रमाणात पारा आणि काहींमध्ये शिसे आढळून आले आहे. पारा हा शरीरासाठी मंद विषासारखा आहे. क्रीम लावल्यावर तो त्वचेद्वारे थेट रक्तात मिसळतो. सुरुवातीला लक्षणे दिसत नाहीत. नंतर लघवीत प्रथिने जाणे, हात-पाय आणि चेहऱ्यावर सूज येणे आणि अखेर मूत्रपिंड निकामी होऊ शकतात. निरोगी आहार, पुरेशी झोप आणि सूर्यापासून संरक्षण हेच खऱ्या सौंदर्याचे गमक आहे.
डॉ. अश्विनी पाटील
प्रसिद्ध त्वचारोग तज्ज्ञ, सहायक प्राध्यापक