इस्लामाबाद,
salal-dam : जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीने धोक्याची पातळी गाठली. या नदीवर बांधण्यात आलेल्या सलाल धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्याने पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक घरे, रस्ते जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले असून, हजारो नागरिकांवर स्थलांतरित होण्याची नामुष्की आली. पाण्यासाठी आकांडतांडव करणाऱ्या पाकिस्तानी नेत्यांच्या धमक्यानंतर भारताने धरणातील अतिरिक्त पाणी सोडले आणि तेथील प्रशासनाची पंचाईत झाली.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सिंधू जल करार स्थगित केला. सीमेवरून वाहणाऱ्या नद्यांचे पाणी रोखण्यासाठी भारताने प्रकल्पनिर्मितीचा धडाका लावला. यामुळे पाकिस्तानच्या अनेक भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाल्याने पंतप्रधान शाहबाज शरीफ ते लष्करप्रमुख असीम मुनीरसह अनेकांनी भारताला धमक्या देणे सुरू केले. अलीकडेच मुनीर यांनी पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची तयारी असल्याचे म्हटले होते. अशातच जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणी जमा झाल्याने भारताने धरणातून अतिरिक्त जलसाठा सोडला. पर्यायाने पाण्यासाठी आकांडताडव करणाऱ्या पाकिस्तानात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. चिनाब नदीच्या पाणलोट क्षेत्रात सततच्या पावसामुळे पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली. पुराचा दबाव कमी करण्यासाठी, चिनाब नदीवरील सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने पाकिस्तानचा पंजाब प्रांत जलमय झाला आहे.
पुरासाठी ठरविले भारताला जबाबदार
चिनाब नदीवर बांधलेले सलाल धरण हे सिंधू पाणी कराराअंतर्गत भारताने बांधलेले पहिले धरण आहे. मुसळधार पावसामुळे सलाल धरणातून अचानक अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे, पाकिस्तानात पुराचा धोका निर्माण झाला आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाने सलाल धरणातून पाणी सोडल्याचा व्हिडीओ शेअर केला. यामुळे पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नद्यांच्या जलसाठ्यात वाढ झाली. सखल भागात पाणी साचले असून, अनेक भाग जलमय झाले. भारताने पाणी सोडल्याने पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे. हजारो नागरिकांवर घरे सोडून सुरक्षित स्थळी जाण्याची परिस्थिती उद्भवली. भारताने पाणी सोडताना कुठलीही सूचना दिली नसल्याचा आरोप पाकिस्तानच्या प्रशासनाकडून केला जात आहे.