लिफाफ्यात जेवढे पैसे ठेवायचा, तेवढेच आम्ही स्वीकारायचो

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
hema malini बॉलिवूडची 'ड्रीम गर्ल' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हेमा मालिनी यांनी त्यांच्या मानधनाबाबत अनेक वर्षांपासून प्रचलित असलेल्या चर्चांवर स्पष्ट भूमिका मांडत त्यामागील वास्तव उघड केले आहे. १९७० च्या दशकात त्या लोकप्रियतेच्या शिखरावर होत्या आणि एका चित्रपटासाठी त्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी होत्या, अशी चर्चा आजही होत असते. मात्र, या सर्व दाव्यांचे खंडन करताना त्यांनी त्या काळातील चित्रपटसृष्टीतील आर्थिक वास्तवही समोर आणले.
 

hema malini reveals truth about highest salary rumours in bollywood 
हेमा मालिनी म्हणाल्या की, त्यांना सर्वाधिक मानधन मिळत असल्याच्या चर्चा पूर्णपणे चुकीच्या आहेत. "नाही, नाही... असं काहीच नव्हतं. तुम्हाला या गोष्टी कुणी सांगितल्या? त्या काळात मला खूप कमी पैसे मिळत होते. मला कधीच जास्त फी दिली गेली नाही. अर्थात, त्या काळातील अनेक निर्माते मला त्यांच्या चित्रपटांसाठी प्राधान्याने निवडत असत. मात्र, मी कधीच पैशासाठी काम केलं नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
मानधनाच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी आजच्या अभिनेत्रींच्या तुलनेत त्यांना मिळणाऱ्या मोबदल्याबाबतही भाष्य केले. "एखादा कलाकार जितका प्रसिद्ध होतो, तितक्या प्रमाणात त्याची किंमत वाढते. पण मला कधीच एवढी मोठी रक्कम मिळाली नाही. उलट आजच्या अभिनेत्रींना मोठ्या प्रमाणात मानधन मिळते. त्यांच्या तुलनेत मला मानधनाचा छोटासा भागही मिळाला नाही. मात्र, त्या काळात कमी पैशातही आम्ही जे काम केलं, तीच आमची खरी कमाई होती. आमच्यासाठी पैशापेक्षा काम अधिक महत्त्वाचं होतं," असे त्या म्हणाल्या.
 
 
हेमा मालिनी यांनी सांगितले की, त्यांनी नेहमीच त्यांचे पती आणि बॉलिवूडचे 'ही-मॅन' धर्मेंद्र यांच्या तत्त्वांचे पालन केले. "मी कधीच माझ्या इच्छेनुसार माझी फी वाढवली नाही. निर्माते जितके पैसे देऊ शकतात, तितकेच मी स्वीकारत असे. एखाद्या निर्मात्याने स्वतःहून अधिक मानधन दिले तर त्याचे स्वागतच असायचे. मात्र, पैशासाठी चित्रपटात काम न करण्याची धमकी आम्ही कधीच दिली नाही. मी कधीही असे वागले नाही," असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी त्यांनी त्यांच्या आई जया चक्रवर्ती यांच्याविषयीही आठवणी सांगितल्या. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात जया चक्रवर्ती या त्यांचे व्यवस्थापन पाहत असत. त्या सर्व निर्मात्यांशी अत्यंत उदारपणे वागत असत, असे सांगताना हेमा मालिनी म्हणाल्या, "एखाद्या निर्मात्याने शूटिंगसाठी पैसे नसल्याचे सांगितले, तर माझी आई 'काही हरकत नाही' असे म्हणायची. १९७९ मध्ये मी 'मीरा' हा चित्रपट केला. त्या वेळी निर्मात्याकडे पैसेच नव्हते. आम्ही कधीच पैशांची मागणी केली नाही. निर्माता लिफाफ्यात जेवढे पैसे ठेवायचा, तेवढेच आम्ही स्वीकारायचो. जणू काही भीकच मिळाली आहे, अशा प्रकारे आम्हाला पैसे दिले जात असत."