नवी दिल्ली,
junior-wimbledon-championships : १८ वर्षीय भारतीय टेनिसपटू अर्णव पापरकरचे नाव सध्या टेनिस जगतात चर्चेचा विषय बनले आहे, याचे मुख्य कारण म्हणजे ३६ वर्षांनंतर एका भारतीय खेळाडूने ज्युनियर विम्बल्डन चॅम्पियनशिपच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. अर्णव पापरकरने १६ जणांच्या फेरीत जपानच्या रयो ताबाताविरुद्ध ५२ मिनिटांत सलग दोन सेट जिंकून उपांत्यपूर्व फेरीत आपले स्थान निश्चित केले. १९९० मध्ये लिएंडर पेस यांच्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा अर्णव पापरकर हा आता केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. पेसने त्या वर्षी विजेतेपदही पटकावले होते.

उपांत्यपूर्व फेरीच्या आधीच्या सामन्यात अर्णव पापरकरने एकतर्फी कामगिरी करत जपानच्या रयो ताबाताविरुद्ध सामन्याचा पहिला सेट ६-२ अशा फरकाने जिंकला. त्यानंतर सर्वांच्या नजरा दुसऱ्या सेटवर खिळल्या होत्या, जिथे अर्णवने आपला प्रभावी फॉर्म कायम ठेवत ६-१ अशा फरकाने विजय मिळवून अंतिम आठ संघांमध्ये प्रवेश केला. अर्णव पापरकर आता उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉर्डन लीचा सामना करेल. लिएंडर पेस, रामनाथन कृष्णन आणि रमेश कृष्णन यांच्यानंतर विम्बल्डन बॉईज सिंगल्सच्या उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवणारा अर्णव पापरकर हा केवळ चौथा खेळाडू ठरला आहे. युकी भांब्रीच्या २००९ च्या ज्युनियर ग्रँड स्लॅम विजेतेपदानंतर ज्युनियर ग्रँड स्लॅमच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा तो पहिला खेळाडू आहे.
१८ वर्षीय अर्णव पापरकर आंतरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या ज्युनियर क्रमवारीत १९ व्या क्रमांकावर आहे. अर्णवने वयाच्या १४ व्या वर्षी मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन अंडर-१४ एशिया पॅसिफिक एलिट ट्रॉफी जिंकून आपले पहिले मोठे विजेतेपद पटकावले. त्याच वर्षी, त्याने वाईल्डकार्ड एन्ट्री म्हणून राष्ट्रीय अंडर-१६ विजेतेपद जिंकले.