पुणे,
Jalebi order and Nasrapur case पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात आरोपीला अवघ्या दोन महिन्यांत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील तपासाला निर्णायक वळण देणारा महत्त्वाचा पुरावा कसा मिळाला, याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी धक्कादायक माहिती दिली आहे. एका स्वीट होममध्ये आलेल्या जलेबीच्या ऑर्डरमुळे सुरू करण्यात आलेल्या इनव्हर्टरमुळे सीसीटीव्ही कॅमेरा सुरू झाला आणि त्यात आरोपी चिमुकलीला सोबत घेऊन जात असल्याचे दृश्य कैद झाले.पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, घटना घडली त्यावेळी संपूर्ण गावात वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले होते.

आरोपीने याच परिस्थितीचा फायदा घेत गुन्हा केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता.मात्र, त्याचवेळी एका स्वीट होममध्ये जलेबीची ऑर्डर आल्याने दुकानातील इनव्हर्टर सुरू करण्यात आला. इनव्हर्टर सुरू होताच दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेराही कार्यान्वित झाला आणि त्यात आरोपी पीडित मुलीला सोबत घेऊन जात असल्याचे दृश्य रेकॉर्ड झाले. तपासादरम्यान हेच सीसीटीव्ही फुटेज सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरले. या दृश्यांमुळे मुलगी शेवटची आरोपीसोबत दिसल्याचे स्पष्ट झाले आणि न्यायालयीन प्रक्रियेत या पुराव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले. पीडित मुलीच्या वडिलांनी सांगितले की, हे सीसीटीव्ही फुटेज मिळाले नसते, तर आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध करणे अधिक कठीण झाले असते. तपास यंत्रणांनी आणि न्यायालयाने अत्यंत वेगाने काम करत दोषीला अल्पावधीत शिक्षा सुनावल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.