'संकट टळेल' असा बनाव करून वृद्धेला ३ लाखांच्या दागिन्यांना गंडा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
- सीसीटीव्हीत कैद झाली ठगांची करामत
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Jewelry stolen इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन अज्ञात ठगांनी धार्मिक श्रद्धेचा गैरफायदा घेत ८१ वर्षीय वृद्धेला संकट टळण्याचे आमिष दाखवून ३ लाख ५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास केला. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे.
 
CHOR
(संग्रहित छायाचित्र ) 
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मेडिकल चौकमध्ये राहणाऱ्या सुजाता मोहनलाल अग्रवाल (८१) या बुधवारी सकाळी रामबाग कॉलनी येथील मंदिरात दर्शनासाठी गेल्या होत्या. सकाळी सुमारे १० वाजता दर्शन करून घरी परतत असताना शिशुपालन शाळेसमोर दोन अज्ञात युवकांनी त्यांना अडविले. आरोपींनी प्रथम त्यांच्या आयुष्यात मोठे संकट येणार असल्याचे सांगितले. त्यानंतर स्वतःच्या आईच्या आजारपणाचा उल्लेख करत संवाद साधला आणि पुढे त्यांच्या मुलावरही मोठे संकट येणार असल्याची भीती दाखवली. हे संकट दूर करण्यासाठी विशेष पूजा करावी लागेल आणि त्यासाठी सोन्याचे दागिने व मोबाईल सोबत घ्यावे लागतील, असा बनाव त्यांनी केला. वृद्धा त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून १० ग्रॅम वजनाची सोन्याची तुळशीमाळ, ४० ग्रॅम वजनाच्या चार सोन्याच्या बांगड्या आणि मोबाईल एका पिशवीत ठेवून आरोपींकडे दिले. त्यानंतर आरोपींनी त्यांना मागे न वळता ५१ पावले पुढे चालत जाण्यास सांगितले. वृद्धा पुढे गेल्यानंतर दोन्ही ठग दागिन्यांची पिशवी घेऊन पसार झाले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुजाता अग्रवाल यांनी इमामवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, एका आरोपीने गुलाबी रंगाचा शर्ट, तर दुसऱ्याने निळ्या रंगाचा चेक्सचा शर्ट आणि निळी जीन्स परिधान केली होती. दोघांचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे त्यांचा शोध सुरू आहे.