बंगळुरू
karnataka road accident कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात झालेल्या भीषण रस्ते अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. मध्यरात्री भरधाव वेगाने जाणारी कार आणि ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत हा अपघात झाला. या दुर्घटनेनंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येल्लापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील अरबैल घाट परिसरात हा अपघात झाला. मध्यरात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास कार आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात कारमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी हुबळी येथील केआयएमएस रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे.अपघातग्रस्त कारमध्ये चालकासह एकूण नऊ जण प्रवास करत होते. ही कार धारवाड येथून धर्मस्थळ आणि चिकमंगळूरच्या दिशेने जात होती. चालक कार अतिशय वेगाने आणि निष्काळजीपणे चालवत असल्याने ती रस्त्याच्या दुसऱ्या मार्गिकेत गेली. त्याच वेळी अंकोलाहून येणाऱ्या ट्रकला कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.
धडक इतकी भीषण होती karnataka road accident की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. अपघातानंतर कारमधून मृतदेह बाहेर काढणेही बचाव पथक आणि पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. मृतांमध्ये धारवाड येथील रहिवाशांचा समावेश असून, ते धर्मस्थळ आणि इतर धार्मिक स्थळांच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेला निघाले होते.या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये कार चालक संजय अंगडी (३३), बसवराज (४८), अभिषेक ईश्वर (२८), अक्षय (२६), अभिषेक (२६) आणि मंजुनाथ चुलकी (३२) यांचा समावेश आहे. सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.या प्रकरणी जखमी तरुण शिवराज यांच्या तक्रारीच्या आधारे येल्लापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.