स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई
अमरावती,
MD and ganja seized गुन्हे शाखा पथक ९ जुलैला आपल्या कार्यालयात हजर असताना खास व विश्वासू बातमीदाराने मॅफेड्रॉन (एम.डी.) या अमली पदार्थाच्या तस्करीविषयी माहिती दिली. शहरातील फरीद नगरातील धर्मकाटा परिसरातील सैफ अली आसिफ अली हा एम.डी. तसेच गांजा या अमली पदार्थांचा व्यवसाय करतो, अशी ती माहिती होती. तो व त्याचे दोन साथीदार ९ जुलैला दुपारी २ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ हद्दीमधील वाळकी डॅमकडे जाणाऱ्या मार्गावर एम.डी. विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती होती.
त्यावरून गुन्हे शाखेच्या पथकाने वाळकी डॅम मार्गावर सापळा रचला व अतिशय शिताफीने आरोपी व त्याच्या दोन साथीदारांना ताब्यात घेतले. या आरोपींची नावे सैफ अली आसिफ अली, आवेजोद्दीन नासीरोद्दीन, रा. हैदरपुरा, अमरावती आणि मोहम्मद तौसिफ मोहम्मद जफर, रा. गौस नगर, अमरावती आहेत. त्यांची अंगझडती घेतली असता ३ लाख १ हजार २०० रुपयांची २२.०७ ग्रॅम एम.डी. पावडर आणि १ किलो १२४ ग्रॅम २२ हजार २७० रुपयांचा गांजा आढळला. हा सर्व माल जप्त करून त्यांच्याविरुद्ध नांदगाव पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. आरोपींनी हा माल इरशाद खान उर्फ अरशद, रा. नागपूर याच्याकडून खरेदी केल्याचे सांगितले.