monsoon health alert पावसाळ्यात हवेत वाढणारा ओलावा आणि दमट वातावरणामुळे संसर्गजन्य आजारांना पोषक परिस्थिती निर्माण होते. या काळात विषाणूंची वाढ वेगाने होत असल्याने विविध आजारांचा प्रसार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. साधा सर्दी-खोकलाही दुर्लक्षित केल्यास तो गंभीर स्वरूप धारण करून न्यूमोनियापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या दिवसांमध्ये होणाऱ्या कोणत्याही संसर्गाकडे हलक्यात पाहू नये.
पावसाळ्यात सर्दी, खोकला आणि ताप येणे ही सामान्य बाब मानली जाते. अनेकदा या त्रासावर घरातील तापाची गोळी घेऊन उपचार केले जातात. मात्र, औषध घेतल्यानंतर ४८ तास उलटूनही ताप कमी होत नसेल, खोकला कायम राहत असेल, श्वास घेण्यास त्रास होत असेल, अंगावर लाल चट्टे येत असतील किंवा नाकातून रक्त येत असेल तर तातडीने रुग्णालयात जाणे गरजेचे आहे. कारण डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया आणि लेप्टोपायरोसिस यांसारख्या आजारांची सुरुवात अनेकदा तापानेच होते. त्यामुळे प्रत्येकवेळी येणारा ताप हा केवळ व्हायरल संसर्गामुळेच असेल असे मानणे धोकादायक ठरू शकते.
पावसाळ्यात रस्त्यांवर साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्यातून चालणे अनेकदा टाळले जात नाही. मात्र, या पाण्यामुळे केवळ चप्पल किंवा बूट खराब होत नाहीत, तर आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. विशेषतः पायाला जखम किंवा कापलेले असल्यास साचलेल्या पाण्यातील बॅक्टेरिया त्या जखमेतून शरीरात प्रवेश करू शकतात. त्यामुळे त्वचेचा संसर्ग होण्याबरोबरच लेप्टोपायरोसिससारखा गंभीर आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारामुळे लिव्हर, किडनी आणि फुफ्फुस निकामी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडताना विशेष काळजी घेणे आवश्यक असून, पायाला जखम असल्यास तिची योग्य निगा राखावी. बाहेरून घरी आल्यानंतर पाय साबणाने स्वच्छ धुवावेत.
पावसाळ्यात घराघरात माशा, इतर किटक आणि डासांचा उपद्रव वाढतो. पावसामुळे विविध ठिकाणी पाणी साचते तसेच हवेत आर्द्रता वाढल्याने वातावरण दमट बनते. हे वातावरण डासांच्या वाढीसाठी पोषक ठरते. मादी डास घरातील फ्लॉवर पॉट, एसी ड्रीप ट्रे, फ्रीजजवळील जागा, कूलर तसेच कुंड्यांच्या खाली अंडी घालतात. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरियाचा धोका वाढतो. या पार्श्वभूमीवर पावसाळ्यात घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
पावसाळ्यात कपडे घरात वाळत घातल्यामुळे घरातील दमटपणा वाढतो. परिणामी अस्थमा, एलर्जी आणि सायनोसायटिस यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. कपडे सुकवण्यासाठी घराबाहेरील पर्याय उपलब्ध नसेल तर घरात बाहेरील हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. तसेच कपडे वाळत घातलेल्या खोलीत फॅन सुरू ठेवावा, ज्यामुळे दमटपणा कमी होण्यास मदत होते. आवश्यक असल्यास डिह्युमिडिफायरचाही वापर करता येतो.
पावसाळ्यात सर्दी, खोकला किंवा ताप आल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे किंवा गोळ्या घेणे टाळावे. कारण अशी औषधे डेंग्यू, चिकनगुनिया, इन्फ्लूएंजा किंवा इतर संसर्गजन्य आजारांमध्ये प्रभावी ठरत नाहीत. ताप कमी होत नाही किंवा प्रकृतीत सुधारणा होत नाही म्हणून घरातील अँटीबायोटिक्स सतत घेत राहिल्यास शरीराची अँटीबायोटिक्सला प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे पुढील उपचारांमध्ये अडचणी निर्माण होऊन उपचारास विलंब होण्याची शक्यता असते.
पावसाळ्यातील बदलत्या वातावरणात योग्य स्वच्छता, काळजी आणि वेळेवर वैद्यकीय सल्ला घेणे यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी करता येऊ शकतो.