'करा किंवा मरा' लढत; संजूला मिळणार संधी, तिलक वर्मा बाहेर?

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
लंडन,
Opportunity for Sanju; Tilak out इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतील चौथा सामना भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. सलग पराभवांमुळे मालिका जिंकण्याची संधी गमावलेल्या श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघासमोर आता उर्वरित दोन्ही सामने जिंकून मालिका बरोबरीत राखण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे चौथ्या सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये काही महत्त्वाचे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवून त्याच्या जागी वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली होती. मात्र, हा निर्णय अपेक्षित परिणाम देऊ शकला नाही. मागील सामन्यात भारतीय संघ अवघ्या ७६ धावांवर गारद झाला, तर इंग्लंडने २०० हून अधिक धावांचा डोंगर उभारत एकतर्फी विजय मिळवला. या पराभवानंतर संघ व्यवस्थापनावर आणि निवडीवर जोरदार टीका सुरू झाली आहे.
 
 
warwet
 
सलग अपयशामुळे कर्णधार श्रेयस अय्यर, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि संपूर्ण संघ व्यवस्थापन चाहत्यांच्या निशाण्यावर आले आहे. संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवल्यानंतर चाहत्यांनी मैदानावर 'संजू... संजू...'अशा घोषणा देत नाराजी व्यक्त केली होती. याच पार्श्वभूमीवर, सातत्याने अपयशी ठरत असलेल्या उपकर्णधार तिलक वर्माला अंतिम अकरातून वगळले जाऊ शकते आणि त्याच्या जागी संजू सॅमसनला पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
२०२६ च्या टी-२० विश्वचषकात एकही पूर्ण सामना न खेळताही 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' ठरलेल्या संजू सॅमसनने त्यानंतर आयर्लंडविरुद्ध दोन सामने आणि इंग्लंडविरुद्ध पहिला टी-२० सामना खेळला. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर वैभव सूर्यवंशीला संधी देण्यासाठी त्याला बाहेर ठेवण्यात आले होते. आता तिलक वर्माच्या खराब फॉर्ममुळे संजूच्या पुनरागमनाची शक्यता अधिक बळावली आहे.फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही बदल होण्याची शक्यता आहे. या मालिकेत अपेक्षित प्रभाव पाडण्यात अपयशी ठरलेल्या वरुण चक्रवर्तीला विश्रांती दिली जाऊ शकते. मागील सामन्यात त्याने तीन षटकांत ३५ धावा दिल्या, मात्र एकही बळी मिळवू शकला नाही. त्याच्या जागी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरला संधी मिळण्याची शक्यता आहे. चौथ्या टी-२० सामन्यासाठी भारताची संभाव्य अंतिम अकरा अशी असू शकते , यात अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, इशान किशन, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव.