परदेशातील भारतीय वंशांचे लोक खलिस्तान्यांचे लक्ष्य

ब्रिटन, कॅनडातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
लंडन/ ओटावा, 
people-of-indian-origin-abroad : पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी खलिस्तानी परदेशातील भारतीय वंशांच्या नागरिकांना लक्ष्य करून मोठा हल्ला करण्याची योजना आखत असल्याची माहिती भारताच्या गुप्तचर संस्थेच्या अहवालातून समोर आली. दहशतवादी ब्रिटन आणि कॅनडातील भारतीय नागरिकांवर हल्ला करण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. अहवालानंतर संबंधित देशातील भारतीय दूतावासाने तेथील भारतीय वंशांच्या नागरिकांना मोबाईलवरून संदेश पाठवून संतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
 
 

khalistani 
 
 
 
गुप्तचर यंत्रणांनी इशारा दिला की, आयएसआय परदेशातील भारतीय समुदायावर हल्ला करण्यासाठी खलिस्तान समर्थक घटकांसोबत कट रचत आहे. हे हल्ले संघटितपणे केले जाऊ शकतात. अहवालाच्या आधारे ब्रिटन आणि कॅनडामधील दूतावासांनी भारतीय वंशांच्या नागरिकांना सुरक्षेबाबत इशारा देताना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. ब्रिटन आणि कॅनडातील भारतीय दूतावासाने यासंदर्भात एक्सवरील पोस्टमधून माहिती देताना म्हटले की, गुप्तचर अहवालानुसार, पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि खलिस्तान समर्थक घटक, भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थक मानल्या जाणाऱ्या लोकांवर हल्ले करण्याचा कट रचत आहेत. अलिकडच्या वर्षांत ब्रिटन आणि कॅनडामधील भारतीय समुदायाविरुद्ध द्वेषपूर्ण गुन्हे आणि हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे, ज्या कथितरित्या खलिस्तान समर्थक घटकांकडून केल्या जात आहेत. पूर्वी अशा घटना तुरळक घडत असल्या तरी, आता त्या अधिक संघटितपणे केल्या जाण्याची भीती आहे. हे संभाव्य हल्ले रोखण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणा पाश्चात्य सुरक्षा यंत्रणांसोबत समन्वय साधून काम करत आहेत.
 
 
सुनियोजित मोहिमेचा भाग
 
इंटेलिजन्स ब्युरोच्या एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले की. खलिस्तान चळवळीला पाठिंबा देणाऱ्या आयएसआयने युरोपमध्ये कार्यरत असलेल्या आपल्या नेटवर्कला ब्रिटन आणि कॅनडातील भारतीय समुदायाविरुद्धच्या कारवाया तीव्र करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटना आता एका सुनियोजित मोहिमेचा भाग असू शकतात. आयएसआय भारतीय समुदायावर समन्वित हल्ल्यांची मालिका करण्याची योजना आखत आहे. हे घटक लोकांना भारत समर्थक किंवा पंतप्रधान मोदींचे समर्थक ठरवून लक्ष्य करू शकतात.
 
 
खलिस्तान्यांविरोधात संताप
 
 
अलिकडच्या वर्षांत ब्रिटन आणि कॅनडामधील खलिस्तान चळवळीला मिळणारा पाठिंबा लक्षणीयरीत्या कमी झाला आहे. पूर्वी, स्थानिक लोकसंख्येचा एक गट या चळवळीशी सहानुभूती बाळगत होता, परंतु ही परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. लोकांचा असा विश्वास आहे की, खलिस्तान चळवळ आणि तिच्याशी संबंधित गुंड टोळ्या आता खंडणी, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रांची तस्करी यांसारख्या गुन्हेगारी कारवायांमध्ये गुंतल्या आहेत. त्यांच्या हिंसक कारवाया भारतीय समुदायाच्या प्रतिमेलाही धक्का पोहोचवत आहेत.