पावसाच्या लपंडावाबरोबरच हंगामी आजारांचेही आगमन

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
-आधी पाऊस आता उकाडा -हवामान बदल, जल प्रदूषणाचा फटका
 
नागपूर,
Pollution and Climate Change काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा लपंडाव,अधूनमधून उकाडा, यामुळे वातावरणात झालेल्या बदल व जल प्रदूषणाचा अनेेकांना फटका बसला असून घरोघरी व्हायरल, ताप, सर्दी तसेच जलजन्य आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. वस्त्या-वस्त्यांमधील दवाखान्यातील गर्दी हेच दर्शवते. पूर्वी कधीतरी होणारे सर्दी-ताप, खोकला आताशा वर्षांतून वारंवार सतावत असल्याचा अनुभव प्रत्येकालाच आता नवा नसून त्याला ‘व्हायरल’ म्हणजे हंगामी म्हटले जाऊ लागले आहे. त्याचे मूळ कारण कमकुवत प्रतिकारशक्ती असले तरी प्रदूषणाबरोबच हवामान बदल हे कारण असल्याचे तज्ज्ञ सांगतात. घरात एकजण तरी सर्दी-ताप व्हायरल आजाराने त्रस्त दिसतो आहे.
 
doctor
 
प्रदूषण व सतत हवामान बदल, त्याचा प्रतिकारशक्तीवर परिणाम विविध कारणांमुळे होत असल्याचे मत तज्ज्ञ डॉक्टरांचे आहे. या महिन्यात प्रारंभी पाऊस पडला. काल बुधवारी दुपारी आला. सायंकाळनंतर पावसाने उसंत घेतली. गुरुवारी दुपारी उकाडा जाणवत होता. पाणी ओसरले तरी वातावरणातील बदल व फटका नागरिकांना बसू लागला आहे. दिवसा किंवा रात्री मध्येच उकाडा (उम्मस) मग पुन्हा पाऊस व थंडी. सर्दी-ताप व्हायरल, मळमळ, उलटी, पोटदुखी, हगवण, डायरिया आदींच्या तक्रारी उद्भवू लागल्या आहेत. शहरातील कुठल्याही भागात जा, वस्त्या-वस्त्यांमधील दवाखान्यांत नागरिकांची गर्दी दिसू लागली आहे.
 
जलजन्य आजाराचे रुग्णही असले तरी पाऊस, घरांमध्ये शिरलेले पाणी यामुळे पोटदुखी, डायरिया हा आजार घरोघरी आहे. गॅस्ट्रो, विषमज्वर, कावीळ वा इतर आजाराचे लगेचच निदान होत नसले तरी, आणखी काही दिवसांनी हे जलजन्य आजार आपले रूप दाखवू शकतात.
नागरिकांनो खबरदारी घ्या
जलजन्य आजार होऊ नये म्हणून नागरिकांनीसुद्धा खबरदारी घेणे गरजेचे आहे. पाणी शुद्ध तसेच उकळून शिळे, उघड्यावरचे, माशा बसलेले पदार्थ खाऊ भांडी, परिसर स्वच्छ ठेवावा. आजारी पडल्यास त्वरित डॉक्टरांकडे जा, असे आवाहन होमिओपॅथ डॉ. शंतनू पांडे यांनी केले आहे.
 
मनपा आरोग्य पथक सक्रिय
शहरातील पाणी साचते व शिरते त्या सर्व भागात महापालिकेचे पथक लक्ष ठेवून आहे. स्वच्छता, जंतूरोधक भुकटी, औषधांची फवारणी केली जात आहे. गरज असेल तेथे क्लोरिनच्या गोळ्या देणे सुरू आहे. आरोग्याची काळजी घेण्याबाबत सांगितले जाते. आजारी आहे का, विचारपूस केली जात आहे. सध्या तरी जलजन्य आजाराचे कुणी आढळले नाहीत. सर्वच भागात आरोग्य पथकाचे लक्ष आहे.
- नोडल वैद्यकीय अधिकारी (साथरोग) मनपा- डॉ. गोवर्धन नवखरे