अनिल कांबळे
नागपूर,
probationary Police नागपूर पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने एका अपघाताच्या दाखल गुन्ह्यात चालकाला आरोपी न करण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच मागितली. लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्या युवकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.
पोलिसांनी पडताळणी करण्यासाठी त्या युवकाकडे व्हॉइस रेकॉर्डर आणि लाचेची रक्कम दिली. त्या युवकाने पोलिस उपनिरीक्षकाला लाच देण्यास होकार कळविला. तो युवक टेकडी रोडवर लाचेची रक्कम आणि व्हॉइस रेकॉर्डिंग घेऊन थांबला. दरम्यान पीएसआय तिथे आला आणि त्याने लाचेची करण्यापूर्वी त्या युवकावर संशय आला. लाच स्वीकारण्यापूर्वीच त्याने त्या युवकाची झडती घेतली. त्याच्या खिशातून व्हाईस रेकॉर्डर आणि रक्कम मिळून आली. पीएसआयने व्हाईस रेकॉर्डर आणि पैसे घेऊन पळ काढला, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. या वृत्ताला एसीबी अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.