राजेश शर्मा यांच्या तब्येतीबाबतच्या अफवा खोट्या

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई,
Rumors about Rajesh Sharma's health 'बजरंगी भाईजान', 'स्पेशल २६', 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी', 'खोसला का घोसला' आणि 'इश्किया' यांसारख्या चित्रपटांतील दमदार अभिनयासाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते राजेश शर्मा सध्या पश्चिम बंगालमधील ढाकुरिया येथील रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावर विविध अफवा पसरल्यानंतर त्यांच्या सहाय्यकाने पुढे येत संपूर्ण परिस्थिती स्पष्ट केली आहे.
 

36567 
प्रभासच्या आगामी 'फौजी' चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कीटक किंवा विषारी कोळ्याने चावा घेतल्यामुळे राजेश शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्या होत्या. मात्र, या सर्व बातम्या चुकीच्या असल्याचे त्यांच्या सहाय्यकाने स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेत्यांना कीटकदंशामुळे नव्हे, तर मधुमेहाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. लवकरच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
यापूर्वी अभिनेत्री सुदीपा चॅटर्जी यांनी शर्मा यांच्या कुटुंबीयांच्या वतीने सोशल मीडियावर एक निवेदन प्रसिद्ध केले होते. त्या निवेदनात रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रभासच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू असताना राजेश शर्मा यांना झुडपांच्या परिसरात उभे असताना एखाद्या किड्याने किंवा विषारी कोळ्याने चावा घेतल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले आणि कोलकात्याकडे रवाना झाले. प्रवासादरम्यान त्यांना तीव्र ताप आणि अस्वस्थता जाणवू लागल्याने त्यांना ढाकुरिया येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवेदनात संसर्ग पायापासून गुडघ्यापर्यंत पसरल्याचा आणि बाधित भागावर फोड आल्याचाही उल्लेख करण्यात आला होता.