'सैराट’मधील सल्याच्या व्हिडीओनंतर मोठी कारवाई

नोबल हॉस्पिटलमधील मेडिकलला ठोकले सील

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
सोलापूर
arbaaz shaikh ‘सैराट’ चित्रपटातील सल्या या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता अरबाज शेख याने सोशल मीडियावर सोलापूरमधील एका रुग्णालयाशी संबंधित व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणाची आता प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाच्या सोलापूर शहर पथकाने मोठी कारवाई करत संबंधित मेडिकल सील केले आहे.
 

sairat actor arbaaz shaikh video leads to action against solapur hospital medical store 
अरबाज शेख याचे वडील सोलापूर येथील नोबल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होते. वडिलांना वाचवायचे आहे, त्यांना मरू द्यायचे नाही, असे म्हणत भावनिक झालेल्या अरबाजने रडत रडत व्हिडीओ तयार केला आणि सोशल मीडियावर मदतीचे आवाहन केले होते. या व्हिडीओमध्ये त्याने रुग्णालयातील मेडिकलमध्ये औषधांच्या नावाखाली जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप केला होता.
 
 
व्हिडीओमध्ये अरबाज शेख म्हणाला होता, “मी सध्या सोलापूरमधील नोबेल हॉस्पिटलसमोर उभा आहे. आठ दिवस झाले, पप्पांना ब्रेन हॅमरेज झाले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सोलापूरला दाखल केले. त्यांचा हार्टचा थोडा त्रास झाल्यानंतर आम्ही त्यांना नोबेल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले.”अरबाजने पुढे सांगितले की, नोबेल हॉस्पिटलमध्ये त्याला अतिशय वाईट अनुभव आला. रुग्णाला दाखल करताना 10 हजार रुपये डिपॉझिट भरण्यास सांगण्यात आले आणि ते भरल्यानंतर औषधांची चिठ्ठी देण्यात आली. ही औषधे बाहेरून आणता येतील का, अशी विचारणा केली असता रुग्णालयातील मेडिकलमधूनच औषधे घ्यावी लागतील, असे सांगण्यात आले.अरबाजच्या म्हणण्यानुसार, त्याला तीन वेळा औषधे आणण्यासाठी पाठवण्यात आले. या औषधांचे बिल 40 हजार रुपयांपेक्षा अधिक झाले. मात्र, हीच औषधे बाहेरून घेतली असती तर जवळपास निम्म्या किमतीत मिळाली असती. 40 हजार रुपयांची औषधे बाहेरून सुमारे 20 हजार रुपयांत मिळाली असती, असा दावा त्याने व्हिडीओमध्ये केला होता.
 
 
या व्हिडीओची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर FDAच्या सोलापूर शहर पथकाने नोबल हॉस्पिटलमधील फातिमा मेडिकलची तपासणी केली.तपासणीदरम्यान मेडिकलमध्ये औषध विक्रीसंदर्भातील अनेक नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. थंड ठिकाणी ठेवणे आवश्यक असलेली औषधे खुल्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले. तसेच विक्रीसाठी ठेवलेल्या औषधांमध्ये मुदत संपलेली औषधेही आढळून आली.या प्रकारानंतर संबंधित मेडिकलला नोटीस बजावण्यात आली असून, ते सील करण्यात आले आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अरुण गोडसे यांनी माहिती दिली.