मुंबई
sairat actor arbaz sheikh नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात सल्याची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख सध्या एका भावनिक कारणामुळे चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्यामध्ये त्याने वडिलांच्या प्रकृतीविषयी माहिती देत चाहत्यांसह सर्वसामान्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे. अरबाजच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यानंतर त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रुग्णालयाकडून होत असल्याचा आरोप केलेल्या आर्थिक लुटीमुळे त्याने वडिलांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. “मला माझ्या बापाला मरताना पहायचं नाहीये, मला काहीही करून त्यांना वाचवायचं आहे,” असे म्हणताना त्याला अश्रू अनावर झाल्याचे या व्हिडीओमध्ये दिसून येते.
व्हिडीओमध्ये अरबाज शेख म्हणतो, “नमस्कार, मी अरबाज शेख. मी आता सोलापुरातल्या नोबल हॉस्पिटलसमोर उभा आहे. वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे आठ दिवसांपूर्वी आम्ही त्यांना सोलापुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. या रुग्णालयाचा अनुभव आम्हाला इतका घाण आला की, जेव्हा आम्ही त्यांना इथे अॅडमिट केलं, तेव्हा सुरुवातीला आम्हाला १० हजार रुपये डिपॉझिट भरायला सांगितलं आणि आम्ही ते भरले. त्यानंतर त्यांनी काही गोळ्यांच्या चिठ्ठ्या दिल्या. मी विचारलं की या औषधं बाहेरून आणू शकतो का, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही, ती आमच्याच मेडिकलमधून घ्यावी लागतील. इंजेक्शन्सही आमच्याकडूनच घ्यावी लागतील.”
यानंतर अरबाजने पुढे सांगितले, “रुग्णालयाच्या मेडिकलमधून औषधं घेतल्यानंतर त्याचं बिल ४० हजार रुपयांपेक्षा अधिक झालं. याच्याआधी आम्ही पप्पांना जिथे दाखल केलं होतं, तिथे आम्हाला बाहेरून गोळ्या घेता येत नव्हत्या. हे चाळीस हजारांचं बिल बाहेरून कदाचित वीस हजारांपर्यंत झालं असतं. पण इथे एवढी लूट होतेय. माझ्या बापाला मला मरताना पहायचं नाहीये. म्हणून त्यांना मला या रुग्णालयातून दुसरीकडे शिफ्ट करावं लागतंय. इथला माझा अनुभव खूपच वाईट आहे. जाणकारांनी मला सांगावं की माझ्या वडिलांना उपचारासाठी कुठे दाखल करावं? मला आता काहीच कळत नाहीये, पण माझ्या बापाला मला काहीही करून वाचवायचं आहे. मला प्लीज मदत करा.”
अरबाज शेखचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. वडिलांच्या उपचारासाठी त्याने आर्थिक मदतीचे आवाहन केले असून, त्याच्या या भावनिक विनंतीनंतर अनेकांनी त्याला धीर देतानाच मदतीसाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शविली आहे.