बंद पडलेल्या शाळेला सात विद्यार्थ्यांच्या प्रवेशाने ‘संजीवन’!

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
- न.प.च्या संत गाडगे महाराज प्राथमीक शाळेतील शिक्षिकेची धडपड
- कॉन्व्हेंट पद्धतीच्या प्रयोगालाही यश

गोंदिया,
Sant Gadge Maharaj Primary School विद्यार्थ्यांच्या घटत्या संख्येमुळे जिल्हा परिषद व नगर परिषद शाळांसमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असताना, गोंदिया शहरातील सूर्याटोला येथील नगर परिषदेची संत गाडगे महाराज मराठी प्राथमिक शाळा तेथील शिक्षिकेच्या जिद्दीने सावरू लागली आहे. घराघरांत जाऊन पालकांचे प्रबोधन करत विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी प्रेरित करण्याबरोबरच न.प. तर्फे शाळेत कॉन्व्हेंट पद्धतीचे शिक्षण प्रयोग सुरू करण्यात आल्याने या शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांची किलबील सुरु झाली आहे. यंदा पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात 7 तर कॉन्व्हेंटमध्ये 10 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने बंद होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या शाळेला नवसंजीवन मिळाले आहे.
 
 
Sant Gadge Maharaj Primary School
 
गोंदिया नगर परिषदेच्या 13 प्राथमिक शाळांमध्ये सुमारे 750 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, इंग्रजी माध्यमाकडे वाढता कल, खासगी शाळांची स्पर्धा आणि बदलती पालकांची मानसिकता यामुळे नगर परिषद व जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थीसंख्या सातत्याने घटत आहे. परिणामी अनेक शाळांवर बंद होण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील श्रीरामपूर व तिरोडा तालुक्यातील बोंडराणी येथील जिल्हा परिषद शाळांना विद्यार्थीसंख्या शून्यावर आल्याने कुलूप लावण्यात आले. त्यातच सूर्याटोला येथील संत गाडगे महाराज मराठी प्राथमिक शाळेतही एकाही विद्यार्थ्याने प्रवेश न घेतल्याने शाळा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, शाळेतील शिक्षिका अश्विनी मिसाळ यांनी धडपड करत घराघरांत जाऊन पालकांशी संवाद साधून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या या प्रयत्नांमुळे इयत्ता पहिली ते चौथ्या वर्गात सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. परिणामी शाळेला कुलूप लागण्यापासून वाचविण्यात यश आले. महत्वाचे म्हणजे, विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी नगर परिषदेतर्फे शाळेत कॉन्व्हेंट पद्धतीच्या शिक्षणाचा प्रयोगही सुरू करण्यात आला असून सद्या सुमारे दहा विद्यार्थ्यांना या कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश देण्यात आले आहे. त्यामुळे बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या या शाळेत पुन्हा विद्यार्थ्यांकडून ‘अ आ इ ई’ चे धडे गिरवले जात आहेत.