वाढदिवशीच घरी पोहोचला शापूर झद्रान यांचा पार्थिव

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
काबूल,
Shapur Zadran's body reaches home अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर झद्रान यांचे ७ जुलै रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी निधन झाले. गंभीर आजाराशी झुंज देत असलेल्या झद्रान यांच्यावर भारतातील दिल्ली-एनसीआरमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे, ८ जुलै रोजी त्यांचा ३९ वा वाढदिवस असताना त्याच दिवशी त्यांचे पार्थिव काबूलमध्ये पोहोचले. या हृदयद्रावक योगायोगामुळे संपूर्ण अफगाणिस्तान शोकमग्न झाला.८ जुलै १९८७ रोजी लोगार प्रांतात जन्मलेल्या शापूर झद्रान यांनी अफगाणिस्तानच्या क्रिकेटच्या सुरुवातीच्या काळात महत्त्वाची भूमिका बजावली होती. उंच बांधा, लांब केस आणि वेगवान गोलंदाजीमुळे त्यांनी क्रिकेटविश्वात वेगळी ओळख निर्माण केली होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी भारताचे दिग्गज फलंदाज गौतम गंभीर आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंनाही बाद केले होते.
 
 
amadapur
 
झद्रान यांचे पार्थिव काबूल विमानतळावर पोहोचताच त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे अधिकारी, विद्यमान आणि माजी क्रिकेटपटू तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी रशीद खान आणि माजी कर्णधार मोहम्मद नबी यांच्यासह अनेक सहकारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः रशीद खान यांना अश्रू अनावर झाल्याचे दृश्य उपस्थितांच्या मनाला चटका लावणारे ठरले. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी १० वाजता काबूलमधील ऐतिहासिक ईदगाह मशिदीत त्यांच्या अंत्यविधीची प्रार्थना पार पडणार असून त्यानंतर मारंजन हिल स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शापूर झद्रान यांनी अफगाणिस्तानसाठी ४४ एकदिवसीय सामन्यांत ४३ बळी, तर ३६ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३७ बळी घेतले. तसेच २०१२-१३ हंगामात त्यांनी बांगलादेश प्रीमियर लीगमध्येही सहभाग नोंदवला होता. त्यांच्या निधनाने अफगाण क्रिकेटने आपल्या सुरुवातीच्या यशस्वी पिढीतील एक महत्त्वाचा खेळाडू गमावला आहे.