महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण

शरद पवार-एकनाथ शिंदे यांची भेट

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
sharad pawar   महाराष्ट्राच्या राजकारणात मंगळवारी घडलेल्या एका भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनात झालेली भेट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वरकरणी ही भेट शिष्टाचार म्हणून पाहिली जात असली, तरी भेटीची वेळ, पद्धत आणि त्यामागील राजकीय परिस्थिती पाहता त्यातून विविध तर्क-वितर्क लावले जात आहेत.
 

sharad pawar    
महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीसाठी शरद पवार विधान भवनात आले होते. बैठक संपल्यानंतर ते थेट एकनाथ शिंदे यांच्या केबिनमध्ये गेले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे उपस्थित होते.
शरद पवार विधान भवनात पोहोचले तेव्हा एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीत व्यस्त होते. मात्र, पवार आल्याची माहिती मिळताच शिंदे यांनी बैठक थांबवून त्यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास १५ मिनिटे चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांचा राजकीय सन्मान राखल्याचे या भेटीतून दिसून आले असून, त्याकडे राजकीय संकेत म्हणून पाहिले जात आहे.
चर्चेनंतर एकनाथ शिंदे पुन्हा कॅबिनेट बैठकीसाठी रवाना झाले. मात्र, शरद पवार काही वेळ त्यांच्या केबिनमध्येच थांबले होते. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांशी संवाद साधला.दरम्यान, शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचीच भेट का घेतली, याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू आहेत. अलीकडेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिंदे यांचे लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील खासदारांकडे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अशा परिस्थितीत पवार यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतल्याने या भेटीकडे विशेष लक्ष दिले जात आहे.ही भेट सत्ताधारी महायुतीतील प्रमुख रणनीतीकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही अप्रत्यक्ष संदेश असल्याचे काही राजकीय जाणकार मानत आहेत. मुख्यमंत्र्यांऐवजी थेट उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन शरद पवार यांनी कोणत्याही सत्ता केंद्राशी थेट संवाद साधण्याची आपली क्षमता दाखवून दिल्याची चर्चा आहे.
राजकीय मतभेद असले तरी मनभेद न ठेवण्याची पवारांची भूमिका कायम राहिली आहे. विविध पक्षांतील नेत्यांशी त्यांचे संबंध असून, संवादाचे मार्ग त्यांनी कधीही बंद केले नसल्याचेही या भेटीच्या निमित्ताने अधोरेखित होत आहे.या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत शरद पवार आणि एकनाथ शिंदे या दोन्ही नेत्यांनी अद्याप कोणतेही सार्वजनिक भाष्य केलेले नाही. मात्र, राजकीय विश्लेषक या भेटीकडे शरद पवार यांची विचारपूर्वक आखलेली रणनीती म्हणून पाहत आहेत. या भेटीचे खरे राजकीय परिणाम आणि त्यातून बदलणारी समीकरणे येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.