सौरव गांगुलींच्या बायोपिकचे पहिले पोस्टर प्रदर्शित

राजकुमार रावच्या लूकवर नेटकऱ्यांची नाराजी

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
मुंबई
sourav ganguly biopic भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि एकेकाळचे स्टार क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. सौरव गांगुली यांच्या जीवनप्रवासावर आधारित या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आले. मात्र, पोस्टर समोर येताच सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
 

sourav ganguly biopic  
या चित्रपटात सौरव गांगुली यांची भूमिका अभिनेता राजकुमार राव साकारणार आहे. राजकुमार राव यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पहिले पोस्टर शेअर करत सौरव गांगुली यांनाही टॅग केले आहे. या पोस्टरमध्ये गांगुली यांच्या कारकिर्दीतील सर्वात चर्चेत राहिलेल्या क्षणांपैकी एक असलेले २००२ सालच्या नेटवेस्ट ट्रॉफी विजयानंतरचे सेलिब्रेशन दाखवण्यात आले आहे.सौरव गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २००२ मध्ये नेटवेस्ट ट्रॉफी जिंकली होती. अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर गांगुली यांनी लॉर्ड्सच्या मैदानावर अंगावरील शर्ट काढून केलेले सेलिब्रेशन प्रचंड गाजले होते. याच ऐतिहासिक क्षणाची झलक चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरमध्ये पुन्हा साकारण्यात आली आहे.मात्र, हे पोस्टर अनेक क्रिकेट चाहत्यांना पसंत पडलेले नाही. सोशल मीडियावर अनेकांनी पोस्टरच्या डिझाइन आणि एडिटिंगवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका नेटकऱ्याने पोस्टरचे एडिटिंग अत्यंत खराब असल्याची प्रतिक्रिया देत, त्यापेक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीने अधिक चांगले पोस्टर तयार करता आले असते, असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने "कृपया हे पोस्टर डिलीट करा," अशी नाराजी व्यक्त केली. काहींनी तर "मजाक लावली आहे का?" अशा शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
 
 
दरम्यान, या चित्रपटातील कलाकारांची निवडही चर्चेचा विषय ठरत आहे. सौरव गांगुली यांच्या भूमिकेत राजकुमार राव दिसणार असून, त्यांच्या पत्नी डोना गांगुली यांच्या भूमिकेत तान्या मानिकतला, आई निरुपा गांगुली यांच्या भूमिकेत अपराजिता आढ्या आणि वडील चंडी गांगुली यांच्या भूमिकेत शाश्वत चटर्जी झळकणार आहेत.या चित्रपटातून सौरव गांगुली यांचा वैयक्तिक जीवनप्रवास, क्रिकेटमधील संघर्ष आणि भारतीय संघाच्या नेतृत्वाची कहाणी उलगडण्यात येणार आहे. गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने केलेली वाटचाल आणि त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे चित्रपटातून दाखवले जाणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा किती पूर्ण करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.