हजारो शिक्षकांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धाव

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन ; जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर

गोंदिया,
Statewide school closure protest शिक्षक कृती महासंघ, जिल्हा गोंदियाच्या नेतृत्वाखाली गुरुवारी ९ जुलै रोजी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला जिल्हाभरातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शाळा बंद ठेवून या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. आंदोलनादरम्यान शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येऊन विविध घोषणाबाजी करत आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी मुख्यमंत्री यांच्या नावे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.
 
 
andolan
 
सादर निवेदनानुसार १ एप्रिल २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टीईटी संदर्भातील न्यायालयीन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी, शिक्षकांना बीएलओ व इतर अशैक्षणिक कामांतून मुक्त करणे, संचमान्यता विषयक अन्यायकारक निर्णय रद्द करणे, विद्यार्थी हितासाठी तातडीने शिक्षक भरती करणे, शिक्षक सरसकट वेतनश्रेणी लागू करणे तसेच शिशुसेवक योजना रद्द करून नियमित शिक्षक भरती प्रक्रिया सुरू करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या. यावेळी शिक्षक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी सांगितले की, हा लढा केवळ शिक्षकांचा नसून ग्रामीण शिक्षण, विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शाळांचे अस्तित्व वाचविण्यासाठीचा आहे. शासनाने सकारात्मक भूमिका घेत मागण्यांवर तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला. या आंदोलनात जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी संघटनेचे समन्वयक एस. यू. वंजारी, शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, शिक्षक भारती विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्रम्हणकर, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष ओ. एस. बिसेन, कास्ट्राइब संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, पुरोगामी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हरिराम येरणे, शुशील बंसोड, राज कडव, जयेश लिल्हारे, संदीप मेश्राम, सुरेंद्र भैसारे, संतोष डोंगरे, अशोक बिसेन, ममता येडे, ममता चुटे, मीनाक्षी पंधरे यासह बहुसंख्येने शिक्षक कृती महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.