वर्धा
teachers protest कार्यरत शिक्षकांना टीईटी अनिवार्यता, पदोन्नती विषयक अन्यायकारक अटी, संचमान्यता व पदोन्नतीचे चुकीचे धोरण आणि बीएलओ व एसआयआर कामाच्या सक्तीच्या विरोधात आज गुरुवार ९ रोजी जिल्ह्यातील शिक्षक एक दिवसाची सामूहिक रजा घेऊन रस्त्यावर उतरले. शिवाजी चौकातून मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.
राज्यातील शिक्षकांसाठी शासनाकडून घेतले जाणारे निर्णय जाचक ठरत असून यामुळे शिक्षकांसह विद्याथ्र्यांचेही भवितव्य अंधकारात ढकलले जात आहे. वारंवार शासनाकडे मागण्या मांडल्या. मात्र, शासनाकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट वेळोवेळी अन्यायकारक निर्णय घेऊन शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण केला जात आहे. त्यामुळे शिक्षकांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाचे जाहीर सभेत रुपांतर झाले. याप्रसंगी काही शिक्षक नेत्यांनी सरकारच्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी विरोधी धोरणांवर कडाडून टीका केली. त्यानंतर मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सरसकट सर्व शिक्षकांना टीईटी अनिवार्यता नको, पदोन्नतीतील अन्यायकारक अटी वगळण्यात याव्या, संच मान्यतेचे अन्यायकारक धोरण तातडीने बदलवावे, बीएलओ आणि एसआयआर सारखी अशैक्षणिक कामांची सक्ती करू नये, शिक्षकांना मुलांना शिकविण्याचे काम करू द्यावे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनाचे नेतृत्व शिक्षक नेते विजय कोंबे, अजय भोयर, लोमेश वर्हाडे, अतुल उडदे, पांडुरंग भालशंकर, अजय वानखेडे, सुरेश बरे, प्रमोद खोडे, गौतम पाटील, प्रमोद मुरार, पराग शेगोकार, अरुण झोटींग, आशिष फरकाडे, सुधीर सगणे, सचिन बटाले, सुधीर राठोड, आदींनी केले. मोर्चात म. रा. प्राथमिक शिक्षक संघ, म. रा. प्राथमिक शिक्षक समिती, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व महामंडळ, प्रहार शिक्षक संघटना, आदी १६ शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या.