दिल्ली वार्तापत्र
punjab congress factionalism पंजाब विधानसभेची निवडणूक अद्याप जाहीर झाली नसताना प्रदेश काँग्रेसमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. निवडणुकीच्या तयारीला लागायच्या आधी काँग्रेस नेतृत्वाची ताकद राज्यातील नेत्यांची मनधरणी करण्यात खर्ची पडत आहे. हा सगळा वाद सुरू झाला, ताे अमरिंदरसिंग राजा वडिंग यांना प्रदेश अध्यक्ष पदावर कायम ठेवण्याच्या काँग्रेस नेतृत्वाच्या निर्णयामुळे. माजी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना प्रदेश अध्यक्ष व्हायचे हाेते, म्हणजे पंजाब विधानसभेची निवडणूक आपल्या नेतृत्वात लढवायची हाेती. राज्यातील बहुतांश काँग्रेस नेत्यांचा त्यांना पाठिंबाही हाेता. या वादावर ताेडगा काढण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाने तीन सदस्यीय समिती पंजाबला पाठवली. अजय माकन, मीनाक्षी नटराजन आणि भजनलाल यादव यांच्या समितीने राज्यातील सर्व स्तरावरील काँग्रेस नेत्यांशी चर्चा करीत अमरिंदरसिंग राजा वडिंग यांना हटवत चन्नी यांना प्रदेश अध्यक्ष करण्याची शिफारस केली. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वाने ही शिफारस फेेटाळून लावत अमरिंदरसिंग यांना अध्यक्ष पदावर कायम ठेवण्याचा निर्णय घेत चन्नी यांची प्रदेश प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.
येथून वाद चिघळला. चन्नी गटाने बंडखाेरीचे निशाण फडकवले. अध्यक्ष नाही तर चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा, अशी मागणी त्यांच्या गटातर्फे करण्यात आली. पक्षांतर्गत गटबाजी टाळण्यासाठी सामूहिक नेतृत्वाच्या आधारावर विधानसभा निवडणूक लढवायची काँग्रेस नेतृत्वाची भूमिका हाेती. विशेष म्हणजे प्रदेश अध्यक्ष अमरिंदरसिंग राजा वडिंग यांनी मुख्यमंत्रिपदाच्या वादापासून स्वत:ला दूर ठेवले. चन्नी वा अन्य काेणताही काँग्रेस नेता मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत राहू शकताे, पण मी त्या शर्यतीत नाही. राहुल गांधी ज्याला मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करतील, त्याच्यासाेबत मी उभा राहील, अशी संयमित प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात आल्यावर काँग्रेसच्या नेतृत्वाने डॅमेज कंट्राेलसाठी प्रदेश प्रभारी भूपेश बघेल यांना तातडीने पंजाबमध्ये पाठवले. पण चन्नी गटाने त्यांच्याशी चर्चा न करता दिल्ली गाठली आणि आम्ही फक्त काँग्रेसच्या नेतृत्वाशीच चर्चा करू, अशी भूमिका घेतली. या वादात काँग्रेस नेते मनीष तिवारी यांच्या नाराजीचे वेगळे उपकथानकही आहे. राज्यातील निवडणूक समितीत स्थान न मिळाल्यामुळे तिवारी यांनी समाजमाध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली.
पंजाब काँग्रेसला तसाही गटबाजीचा शाप आहे. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधीही पंजाब काँग्रेसमध्ये वाद झाला हाेता, त्यावेळी वादाचा केंद्रबिंदू अमरिंदरसिंग हाेते; आणि याेगायाेग म्हणजे २०२६ मध्येही प्रदेश काँग्रेसमध्ये जाे वाद सुरू आहे, त्या वादाचा केंद्रबिंदूही अमरिंदरसिंग आहेत. फरक म्हणजे त्यावेळचे अमरिंदरसिंग कॅप्टन हाेते आणि आताचे अमरिंदरसिंग राजा वडिंग आहेत.
२०२६ मध्ये चरणजितसिंग चन्नी आणि अमरिंदरसिंग राजा वडिंग यांच्यात जसा वाद सुरू आहे, तसाच २०२२ मध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्याेतसिंग सिद्धू यांच्यात सुरू झाला हाेता. २०१७ ची निवडणूक काँग्रेसने जिंकली आणि कॅप्टन अमरिंदरसिंग मुख्यमंत्री झाले. २०१७ ची निवडणूक आपली शेवटची निवडणूक आहे, यानंतरही आपण निवडणूक लढणार नाही, असा भावनिक प्रचार तेव्हा कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी केला हाेता. त्यामुळे काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर कॅप्टन मुख्यमंत्री झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी सिद्धू यांनी भाजप साेडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सिद्धू हे राज्यातील काँग्रेसचे भविष्य असल्याची प्रतिक्रिया तेव्हा प्रदेश प्रभारी असलेले हरीश रावत यांनी व्यक्त केली हाेती; पण याच सिद्धूंनी नंतर राज्यातील काँग्रेसचे भविष्य अंधकारमय केले. काँग्रेसच्या नेतृत्वालाही तेव्हा सिद्धू यांच्याकडून खूप अपेक्षा हाेत्या. कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या मंत्रिमंडळात सिद्धू यांचा समावेश झाला, पण या दाेघांचे काही जमले नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि नवज्याेतसिंग सिद्धू यांच्यात वाद नाही तर संघर्ष सुरू झाला. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वाने कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी मुख्यमंत्रिपदावरून हटवत त्यांच्या जागेवर चरणजितसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री केले. एवढेच नाही तर सुनील जाखड यांना प्रदेश अध्यक्ष बनवले. मात्र, सिद्धू यांचे समाधान झाले नाही. मुख्यमंत्रिपदावर डाेळा असलेल्या सिद्धू यांचे नंतर चन्नी यांच्याशीही पटले नाही, दाेघांतील संबंध तणावपूर्ण झाले. त्याची परिणती राज्यातील काँग्रेसच्या सत्ता गमावण्यात झाली. विशेष म्हणजे मुख्यमंत्रिपद गमावल्यामुळे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस साेडत आधी आपला वेगळा पक्ष स्थापन केला आणि नंतर भाजपात प्रवेश केला, तर नवज्याेतसिंग सिद्धू यांनी आधी काँग्रेस आणि राजकारणही साेडले. आज सिद्धू कुठे आहे, हे काेणालाही माहीत नाही. कॅप्टन अमरिंदरसिंग आणि सिद्धू यांच्यात वाद सुरू हाेता, तेव्हा सुनील जाखड प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हाेते. काही दिवसांनी सुनील जाखड यांनीही काँग्रेसला कंटाळून भाजपात प्रवेश केला. आताआतापर्यंत सुनील जाखड पंजाब भाजपाचे अध्यक्ष हाेते. पंजाब काँग्रेसमध्ये जेव्हा जेव्हा वाद झाला, त्याचा फायदा भाजपाला झाला आहे. यावेळी पंजाब भाजपा अध्यक्षांनी चरणजितसिंग चन्नी यांना भाजपात येण्याचे निमंत्रण देऊन टाकले. दुसरीकडे पंजाब काँग्रेसचे नेते सुखजिंदरसिंह रंधावा यांनी गृहमंत्री अमित शाह यांची नुकतीच भेट घेतल्यामुळे वेगळी चर्चा सुरू झाली आहे.
पंजाब प्रदेश काँग्रेसमधील ताज्या पेचप्रसंगांची परिणती अखेर कशात हाेणार, हे आताच सांगता येणार नाही. या वादात अमरिंदरसिंग राजा वडिंग यांचा बळी जाणार की चरणजितसिंग चन्नी माघार घेणार, हे आताच सांगता येणार नाही. मात्र एक नक्की आहे, याचा फटका काँग्रेसला बसणार! राज्यात तशीही काँग्रेस सत्तेवर येण्याची शक्यता नाहीच्या बराेबर आहे. काँग्रेसची यात दुहेरी गाेची आहे.punjab congress factionalism काँग्रेस चन्नी यांच्यावर काेणतीही कारवाई करू शकत नाही. कारण चन्नी हे राज्यातील दलित नेते आहेत आणि पंजाबमध्ये दलित मतदारांची संख्या ३० ते ३५ टक्के आहे. चन्नी यांच्यावर काेणतीही कारवाई केली तर दलितांची नाराजी काँग्रेसला ओढवून घ्यावी लागेल; जी काँग्रेसला परवडणारी नाही.
२०२२ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसने अमरिंदरसिंग राजा वडिंग यांना प्रदेश अध्यक्ष बनवले. आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात अमरिंदरसिंग यांनी काँग्रेसला लाेकसभा निवडणुकीत चांगले यश मिळवून दिले. त्यामुळे राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या ताेंडावर त्यांना हटवणे काँग्रेसच्या नेतृत्वाला याेग्य वाटले नाही, त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावार कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. २०२२ मध्ये काँग्रेसच्या राज्यातील पराभवाची पटकथा सिद्धू यांनी लिहिली, यावेळी त्या भूमिकेत चरणजितसिंग चन्नी आहेत. पंजाबमध्ये काँग्रेसला पराभूत करण्यात भाजपाला फारसे कष्ट घ्यावे लागणार नाही, भाजपाची ही जबाबदारी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या शिरावर घेतली आहे आणि ती ते प्रामाणिकपणे पार पाडतील, यात शंका नाही. पंजाब काँग्रेसच्या नेत्यांनी राजकीय आत्महत्या करण्याचे ठरविले असेल तर त्याला काेणी कसे काय राेखू शकणार?
श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७