मेलबॉर्न,
ancient-sculptures-in-india : परस्पर कायदेशीर सहाय्य कराराच्या अंतर्गत ऑस्ट्रेलिया तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरलेल्या तीन प्राचीन कलाकृती भारताला परत करीत आहे. यात सहा मुखे असलेली कार्तिकेयाची मूर्ती, नंदीची मूर्ती आणि भद्रकालीसह असलेल्या त्रिशुळाचा समावेश आहे. या कलाकृती परत येणे म्हणजे केवळ भारताचा सांस्कृतिक वारसा पुनर्स्थापित होण्याचेच नव्हे, तर दक्षिण भारतीय राज्यांच्या वारशातील एका नवीन पर्वाची सुरुवात होण्याचे प्रतीकही आहे.
चोल काळातील कार्तिकेयाची मूर्ती, चौदाव्या शतकातील नंदीची शिल्पकला आणि चोल काळातीलच त्रिशूळ हा भारताचा ऐतिहासिक ठेवा ऑस्ट्रेलियातून परणार असून, अनेक वर्षे विदेशात राहिल्यानंतर त्यांना आता भारतीय संग्रहालयामध्ये स्थान मिळणार आहे. भारताच्या या ऐतिहासिक ठेव्यांचे पुनरागमन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ऑस्ट्रेलिया दौरा एकाच वेळी घडत आहे.
सध्या ‘नॅशनल गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया’मध्ये असलेल्या या तीन प्राचीन कलाकृती परस्पर कायदेशीर सहाय्य कराराच्या अंतर्गत परत आणल्या जात आहेत. या कलाकृती तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरून त्यांची विदेशात तस्करी करण्यात आली, असे तामिळनाडूच्या ‘आयडोल विंग सीआयडी’ने केलेल्या तपासातून निषन्न झाले होते. जगभरातील संग्रहालयांमधील अनेक कलावस्तूंना जी स्थिती असते, तशी स्थिती दक्षिण भारतीय मंदिरांमधील वस्तूंची नव्हती. या वस्तू काचेच्या पेटीत बंदिस्त ठेवण्यासाठी नव्हत्या, तर मध्ययुगीन काळात त्या मंदिरातील दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग होत्या.
भारतात येणाऱ्या वस्तूंमध्ये षण्मुखाची एक दगडी मूर्ती आहे. षण्मुख हे कार्तिकेयाचे सहामुखी रूप असून, विविध परंपरांमध्ये त्याला मुरुगन, स्कंद आणि सुब्रमण्यम नावाने ओळखले जाते. सुमारे नऊ शतकांपूर्वी ही मूर्ती कोरली आहे. तिचे योग्य स्थान तामिळनाडूतील कुंभकोणमजवळ असलेल्या मनमबडी येथील नागनाथस्वामी मंदिरात आहे. दुसरी वस्तू म्हणजे भगवान शिवांचे वाहन असलेला पवित्र वृषभ ‘नंदी’ची पाषाण मूर्ती. ही मूर्ती सध्याच्या तिरुवारूर जिल्ह्यातील ‘कडुवनकुडी’ येथील कैलासानाथर मंदिरातील असून, ती १३ व्या ते १६ व्या शतकातील आहे.
भद्रकालीची मूर्ती असलेला एक दुर्मिळ धार्मिक त्रिशूळ
भारतात परतणाऱ्या तीन कलाकृतींपैकी एक कलाकृती विशेष उल्लेखनीय आहे. ही एखाद्या देवळात स्थापित केलेली पाषाणमूर्ती किंवा पूजेसाठी वापरली जाणारी एखादी कांस्यमूर्ती नाही. हा धातूपासून बनवलेला एक धार्मिक त्रिशूळ आहे, ज्याच्या वरच्या टोकावर देवी भद्रकालीची मूर्ती विराजमान आहे. हा त्रिशूळ तामिळनाडूतील 'श्री काशीविश्वनाथस्वामी' मंदिरातील असून तो उत्तर चोल काळातील आहे.