मुंबई,
transfers-of-civil-servants : राज्य शासनाने आठ वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. या नव्या फेरबदलांमुळे पुणे, मुंबई, नवी मुंबई, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमधील अनेक महत्त्वाच्या विभागांना नवे प्रशासकीय प्रमुख मिळाले आहेत. या संदर्भातील अधिकृत आदेश जारी करण्यात आला आहे.

अमरावती महानगरपालिकेच्या आयुक्त वर्षा लड्डा यांची पुण्यात बदली करण्यात आली आहे. जगदीश मिनीयार यांच्या जागी आता वर्षा लड्डा पुणे येथील महिला व बाल कल्याण विभागाच्या नवीन आयुक्त असणार आहेत. डॉ. मंगेश गोंदवले यांना अमरावती महानगरपालिकेचे नवीन आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले. पुणे येथील महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेले रूचेश जयवंशी यांची बदली आता मुंबईत करण्यात आली आहे. श्रीधर दुबे यांची नवी मुंबई येथील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली. नवी मुंबई येथील राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांची पुण्याला बदली झाली आहे. पुणे येथील महिला व बाल कल्याण विभागाचे आयुक्त जगदीश मिनीयार यांची छत्रपती संभाजीनगर येथे बदली करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे सचिव पंकज देवरे यांची बदली एमएमआरडीएमध्ये झाली आहे. याशिवाय पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्त डॉ. मंजिरी मानोलकर यांची पुणे येथीलच महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून बदली केली आहे.