परिवहन व्यवस्था सक्षम करण्यासाठी धोरण तयार होणार

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
-परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांची माहिती
-ब्रिक्स सदस्य देशांची बैठक सुरू
-११ देशांचे प्रतिनिधी सहभागी
-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली उद्या बैठक
 
नागपूर, 
Transport system परिवहन क्षेत्रात ब्रिक्स सदस्य देशांमधील परस्पर सहकार्य अधिक मजबूत करणे, शाश्वत विकासाला चालना देणे, नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि भविष्यातील परिवहन व्यवस्था सक्षम करण्यासाठी समान धोरण तयार करणे या मुख्य उद्देशाने बैठकीचे आयोजन केले स्ल्याची माहिती परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी दिली. भारताच्या ब्रिक्स २०२६ अध्यक्ष पदांतर्गत ११ सदस्य देशांमध्ये चर्चा सुरू झाली असून बैठकीत ब्रिक्स सदस्य देशांतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत.
 
 
bricks-parishad.123
 
नागपूरच्या हॉटेस रॅडिसन ब्लू येथे ब्रिक्स देशाच्या परिवहन कार्यगटाच्या तिसऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्ही. उमाशंकर आले आहेत. या बैठकीला गुरुवारी प्रारंभ झाला. यात प्रामुख्याने शहरी गतिशीलता, शाश्वत परिवहन, परिवहनाचे डिजिटलीकरण, शाश्वत विमान इंधन, रेल्वे संशोधन, रसद व्यवस्था आणि परिपत्र अर्थव्यवस्था यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात आहे.

चर्चेनंतर ठोस निर्णय घेतले जाणार
या बैठकीत मुख्यत: ब्रिक्स सदस्य देशांतील वरिष्ठ अधिकारी आणि प्रतिनिधी सहभागी झाले असून परिवहन कार्यगटाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत अतिशय महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जात आहे. शनिवार, ११ जुलै रोजी होणाऱ्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी विविध विषयांवर अंतिम चर्चा होईल.
 
सर्व प्रतिनिधींचे थाटात स्वागत
भारताच्या ‘अतिथी देवो भव’ या परंपरेनुसार सर्व परदेशी प्रतिनिधींचे गुरुवारी थाटात स्वागत केल्यामुळे सर्व विदेशी प्रतिनिधींना पहिल्याच दिवशी चांगला अनुभव मिळाला, अशी माहिती परिवहन मंत्रालयाचे सचिव व्ही. उमाशंकर यांनी माध्यम प्रतिनिधींना दिली.
 
महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी होणार
व्ही. उमाशंकर म्हणाले की, ही परिवहन कार्यगटाची तिसरी मंत्रिस्तरीय बैठक असून परिवहन क्षेत्रातील सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी ही चर्चा महत्त्वपूर्ण ठरणार आहे. दोन दिवसांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर शनिवार, ११ जुलै रोजी मंत्र्यांच्या बैठकीत महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केल्या जाईल.
भारताने आपल्या अध्यक्षपदासाठी नवकल्पना, सहकार्य आणि लवचीकता या संकल्पनांना प्राधान्य दिले आहे. शाश्वत विकासासाठी लवचीकता हा अत्यंत महत्त्वाचा घटक असून सर्व सदस्य देशांनी या समान उद्दिष्टांसाठी एकत्र काम करावे, असा भारताचा प्रयत्न आहे.
 
परिवहन क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणार
केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स परिवहन मंत्र्यांची बैठक ११ जुलै रोजी होणार आहे. या बैठकीत परिवहन क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करणे, शाश्वत विकासाला चालना देणे, लवचीकता वाढविणे, भविष्योन्मुख गतिशीलतेला प्रोत्साहन देणे आणि महत्त्वाच्या सामंजस्य करारांना अंतिम मान्यता देण्यात येणार आहे.