त्यांच्या एक हल्ल्याला आमचे २० प्रत्युत्तर!

इराणला ट्रम्प यांचा थेट इशारा

    दिनांक :09-Jul-2026
Total Views |
वॉशिंग्टन,
Trump's direct warning to Iran इराणवरील अमेरिकेच्या ताज्या हवाई कारवाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत आक्रमक भूमिका मांडत इराणला स्पष्ट इशारा दिला आहे. शांतता करार संपुष्टात आल्याची घोषणा केल्यानंतर अमेरिकेने बुधवारी इराणमधील चाबहार, बुशेहर आणि बंदर अब्बास येथील महत्त्वाच्या लक्ष्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केले. या कारवाईनंतर ट्रम्प यांनी सांगितले की, इराणकडून झालेल्या एका हल्ल्याच्या प्रत्युत्तरात अमेरिकेने २० पट ताकदीने उत्तर दिले आहे.प्रसारमाध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, इराणने अमेरिकेच्या तीन बोटींवर हल्ला केला होता आणि त्याचाच बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली. त्यांनी इशारा देताना म्हटले की, भविष्यातही इराणने अमेरिकेवर हल्ला केल्यास त्याला २० पट अधिक कठोर प्रत्युत्तर दिले जाईल. त्यांच्या मते, अमेरिका प्रत्येक वेळी अधिक ताकदीने उत्तर देईल.
 
 

raygad 
 
यापूर्वी मंगळवारीही अमेरिकेने इराणमधील ८० हून अधिक लष्करी लक्ष्यांवर हवाई हल्ले केल्याचा दावा करण्यात आला होता. पुढील कारवाईबाबत विचारले असता ट्रम्प म्हणाले की, लष्करीदृष्ट्या अमेरिका आधीच वरचढ ठरली असून इराणकडे आता फारसे काही उरलेले नाही. त्यांनी असा दावाही केला की, इराणकडून नुकताच संपर्क साधण्यात आला असून त्यांना कोणत्याही परिस्थितीत करार हवा आहे. मात्र, ते कराराचे पालन करतील का, याबाबत आपल्याला शंका असल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणने व्यापारी जहाजांवर हल्ले का केले, असा प्रश्न विचारला असता ट्रम्प यांनी इराणच्या नेतृत्वावर टीका करत, "ते थोडे वेडेच आहेत," अशी प्रतिक्रिया दिली.
 
 
यावेळी ट्रम्प यांनी स्पेनचाही उल्लेख केला. स्पेनसोबत मतभेद असल्याचे सांगत त्यांनी अखेर स्पेनने अमेरिकेच्या आर्थिक मागण्यांना मान्यता दिल्याचा दावा केला. अन्यथा त्यांच्याशी चर्चा करण्याची गरजच भासली नसती, असेही त्यांनी म्हटले.युरोपमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी ग्रीनलँड आणि इराणचा संदर्भ देत, पुढील निर्णय परिस्थितीवर अवलंबून असेल, असे सांगितले. इराणच्या मुद्द्यावर आता अनेक देश मदतीसाठी पुढे येत असले तरी अमेरिकेला त्याची गरज नसल्याचे त्यांनी नमूद केले.