तेहरान,
US attempt to block Khamenei's funeral procession अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष पुन्हा तीव्र झाला असून दोन्ही देशांकडून एकमेकांवर सातत्याने हल्ले सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणमधील मशहद शहरातील दोन महत्त्वाचे पूल उद्ध्वस्त केल्याचा दावा करण्यात आला आहे. हे शहर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचे मूळ गाव असून, गुरुवारी ९ जुलै रोजी त्यांच्यावर याच शहरात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगितले जात आहे.या कारवाईनंतर इराणने अमेरिकेवर गंभीर आरोप करत, अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे खामेनेई यांच्या अंत्ययात्रेवर परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे. मशहदमधील एका हॉटेलवर 'आम्ही ट्रम्पला ठार मारू' असा मजकूर असलेला बॅनर लावण्यात आल्याचीही माहिती समोर आली असून, अमेरिकेविरोधात आणि ट्रम्प यांच्याविरोधात इराणमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, इराणनेही अमेरिकेच्या नौदल मुख्यालयाजवळ हल्ला केल्याचा दावा केला असून इतर काही ठिकाणांनाही लक्ष्य करण्यात आल्याचे वृत्त आहे. या घडामोडींनंतर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वॅन्स यांनी इराणवर व्यापारी जहाजांवर पुन्हा हल्ले करून नुकत्याच झालेल्या कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. स्ट्रेट ऑफ होर्मुझमध्ये जहाजांचा मार्ग अडविण्याचा आणखी प्रयत्न झाल्यास अमेरिका कठोर प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. युद्धामुळे अमेरिकेलाही मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात येत आहे. अहवालानुसार, एका अमेरिकी अधिकाऱ्याने सांगितले की, संघर्ष सुरू झाल्यापासून इराणने अमेरिकेचे ३० एमक्यू-९ रीपर ड्रोन पाडले आहेत. प्रत्येक ड्रोनची अंदाजे किंमत ३ कोटी डॉलर (३० मिलियन डॉलर) असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.