ट्रकच्या धडकेने जलवाहिनी फुटली पेट्रोल पंप आणि परिसर जलमय
नांदगाव पेठ,
Water crisis in Amravati येथील अग्रवाल पेट्रोल पंपावर गुरुवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडलेल्या अनियंत्रित ट्रकच्या अपघातामुळे अमरावतीकरांवर पुन्हा जलसंकट उभे ठाकले आहे. डिझेल भरण्यासाठी येत असलेल्या यूपी ७८ डीटी ४५७७ क्रमांकाच्या ट्रकचे अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ट्रक थेट अप्पर वर्धा धरणातून अमरावतीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर जाऊन आदळला. या जोरदार धडकेत जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. जलवाहिनी फुटताच तब्बल ५० फूट उंचीपर्यंत पाण्याचे कारंजे उडू लागले. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. काही वेळातच पेट्रोलपंप परिसर आणि आजूबाजूचा भाग पूर्णपणे जलमय झाला.
अपघातात ट्रकने दोन दुचाकी आणि पेट्रोलपंपावरील जनरेटरलाही जोरदार धडक दिल्याने त्यांचेही मोठे नुकसान झाले. तसेच जवळील एका टायर रिमोल्डिंगच्या दुकानात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शेजारील एका हॉटेलमध्येही पाणी शिरल्याने हॉटेल मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले. परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने पेट्रोलपंपाच्या जमिनीखालील इंधन टाक्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता लक्षात घेऊन पेट्रोलपंप व्यवस्थापनाने खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने इंधन विक्री बंद केली. शहानिशा करूनच इंधन विक्री केली जाईल, असे अग्रवाल ऑटो सर्व्हिसचे संचालक आझाद अग्रवाल यांनी सांगितले.
या घटनेमुळे आधीच दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा सहन करणाऱ्या अमरावतीकरांच्या चिंतेत भर पडली आहे. मुख्य जलवाहिनीचे मोठे नुकसान झाल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत शहराचा पाणीपुरवठा एक ते दोन दिवस विस्कळीत राहण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तातडीने उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्रीनंतर दुरुस्तीच्या कामाला वेगाने सुरुवात होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.