वेध. . .
fmge exam आपण डॉक्टर व्हावे. आपले व आपल्या कुटुंबाचा समाजात चांगला लौकिक करावा. परिवाराला आर्थिक हातभार लावावा, असे स्वप्न अनेक विद्यार्थी उराशी बाळगून असतात. मात्र, सर्वांचे हे स्वप्न पूर्ण होतेच, असे नाही. कारण, अनेक विद्यार्थ्यांना पात्रता प्रवेश परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण न झाल्यामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश मिळू शकत नाही. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी असलेली पात्रता प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी कमीत कमी १२० गुण आवश्यक असतात. पण, त्या विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही. असे असले तरी, खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळू शकतो. पण, त्यासाठी असलेले शैक्षणिक शुल्क भरमसाट असते. अंदाजे १ कोटी रु. लागतात. एवढे पैसे भरण्याची सर्वांचीच आर्थिक परिस्थिती नसते. ज्यांची असते ते पालक आपल्या पाल्यांना खाजगी वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतात. अशा वेळी काही जण परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा सल्ला देतात. रशिया, चीन, युक्रेन, फिलिपिन्स इत्यादी देशांत आपल्या देशातील खाजगी महाविद्यालयांपेक्षा कमी पैशात वैद्यकीय शिक्षण मिळते. आपल्या देशात १ कोटी रु. लागत असतील तर, तिकडे ३० ते ४० लाखांत हे शिक्षण घेऊन एमबीबीएसची पदवी मिळविता येते. पण, असा सल्ला जर कोणी देत असेल आणि आपण त्यानुसार परदेशात जाण्याची तयारी करीत असाल तर, जरा थांबा. कारण, केवळ तिकडची डिग्री घेतली म्हणजे भारतात आपल्याला प्रॅक्टिस करता येईल, असे समजू नका. भारतात प्रॅक्टिस करण्यासाठी एफएमजीई या पात्रता परीक्षेच्या दिव्यातून जावे लागते. आता एफएमजीई ही काय भानगड आहे, असे साहजिकच आपल्या मनात प्रश्न उत्पन्न हाेईल. तर, एफएमजीई म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झामिनेशन.

परदेशातून एमबीबीएसची पदवी घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच ही परीक्षा आहे. म्हणजे, एखाद्या विद्यार्थ्याला वैद्यकीय शिक्षण पात्रता परीक्षेत १२० गुण मिळाले. त्याने भारतातीलच एखाद्या खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणाची पदवी मिळविली असल्यास त्याला अशी कोणतीही परीक्षा न देता प्रॅक्टिस सुरू करता येते. पण, परदेशातून अशी पदवी प्राप्त करून आल्यावर त्या विद्यार्थ्याला एफएमजीई ही परीक्षा द्यावीच लागते. केवळ परीक्षा देऊन भागत नाही तर, ती उत्तीर्ण करावी लागते आणि उत्तीर्ण होण्यासाठी किमान ५० टक्के गुण मिळवावे लागतात. म्हणजे ३०० गुणांच्या पेपरमध्ये किमान १५० गुण प्राप्त झाले तरच तो विद्यार्थी उत्तीर्ण होतो. अन्यथा परदेशातील वैद्यकीय पदवीचा कोणताही उपयोग होत नाही. त्यामुळे एमबीबीएस झाला असला तरी तो विद्यार्थी १२ वी पासच समजला जातो. २००२ साली तत्कालीन सरकारने ही परीक्षा सुरू केली होती. यावर्षी जूनमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. नुकताच निकालही जाहीर झाला. या परीक्षेला देशभरातून ३७ हजार ४४८ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ३१ हजार ६४५ नापास झाले. त्यातही ४ हजार १५७ विद्यार्थी असे आहेत ज्यांना १४० ते १४९ दरम्यान गुण मिळाले. तर, ६३२ विद्यार्थ्यांना १४९ गुण प्राप्त झाले. त्यामुळे ते नापास झाले.fmge exam आता या विद्यार्थ्यांना पुन्हा ही परीक्षा द्यावी लागणार आहे. या परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न मास्टर्स म्हणजे एम. डी. अभ्यासक्रमातील होते, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. खरं म्हणजे ज्या देशातून या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय पदवी मिळविली आहे, त्या देशाने त्यांना त्याच देशात प्रॅक्टिस करण्याची परवानगी दिली आहे. आता कोणताही देश आपल्या देशातील नागरिकांच्या जिवाशी खेळणार नाही, हे नक्की. मग, भारतात आल्यावर एवढी कठीण परीक्षा घेण्याचे कारण काय ? असा निर्णय घेताना तत्कालीन सरकारच्या मनात काय होते? या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहे. यावर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचे हॉल तिकीट विद्यार्थ्यांना चार दिवस अगोदर ऑनलाईन पाठविण्यात आले. त्यात केवळ परीक्षा कोणत्या शहरात होणार एवढेच सांगितले होते. विद्यार्थ्यांनी परीक्षा होणाऱ्या ज्या शहरांची नाव दिली होती, त्यापैकी त्यांच्या शहरापासून लांब असलेल्या शहरात त्यांना परीक्षा केंद्र देण्यात आले. कदाचित अलिकडे झालेल्या पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे असे करण्यात आले असावे.
वर्तमान सरकाने यात विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्यासाठी या निर्णयाचे पुनरावलोकन करणे गरजेचे आहे. तसे करणे शक्य नसेल तर, देशातील वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक शुल्क किंवा इतर खर्च कमी केला पाहिजे. देशांतर्गत वैद्यकीय शिक्षण स्वस्त झाल्यास आपले विद्यार्थी परदेशात वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी जाणारच नाहीत. तेव्हा, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त करावीशी वाटते.
विजय कुळकर्णी
८८०६००६१४९