मुंबई
shailesh lodha daughter ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले अभिनेते शैलेश लोढा यांच्या मुलीचा विवाहसोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात पार पडला. या शाही सोहळ्याला बॉलिवूड, राजकारण, साहित्य, क्रीडा आणि अध्यात्म क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. अभिनेता विकी कौशलदेखील या विवाहसोहळ्यासाठी खास उपस्थित होता. मात्र, या सर्वांमध्ये ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील एकही कलाकार किंवा निर्माते दिसून न आल्याने सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे.
शैलेश लोढा यांनी अनेक वर्षे या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्यांच्या मुलीच्या लग्नाला मालिकेतील कलाकार उपस्थित राहतील, अशी अनेक चाहत्यांची अपेक्षा होती. मात्र, दिलीप जोशी (जेठालाल), मुनमुन दत्ता (बबिताजी), सोनालिका जोशी (माधवी), अमित भट्ट (चंपकलाल उर्फ बापूजी), मंदार चांदवडकर (भिडे) यांच्यासह मालिकेतील इतर जुने-नवे कलाकार तसेच निर्माते असित कुमार मोदीदेखील या विवाहसोहळ्यात दिसले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेकांच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला आहे की, याचा संबंध शैलेश लोढा आणि निर्माते असित कुमार मोदी यांच्यात पूर्वी झालेल्या वादाशी आहे का?
या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. एका युजरने प्रतिक्रिया देताना लिहिले, “लोकांच्या लक्षात आलंय की ‘तारक मेहता’मधील जवळपास एकही कलाकार या लग्नाला उपस्थित नव्हता. शैलेश यांच्या जवळचे मानले जाणारे दिलीप जोशीसुद्धा दिसले नाहीत. जर वाद फक्त असित मोदींसोबत होता, तर इतर कलाकार लग्नाला का आले नाहीत?”
दरम्यान, शैलेश लोढा यांची कन्या स्वरा लोढा हिचा विवाह ७ जुलै २०२६ रोजी जोधपूर येथील प्रसिद्ध उमेद भवन पॅलेसमध्ये अत्यंत दिमाखदार वातावरणात पार पडला. या सोहळ्याला अभिनेता विकी कौशल, कवी कुमार विश्वास, योगगुरू बाबा रामदेव, क्रिकेटपटू इरफान पठाण, राजस्थानचे shailesh lodha daughter मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, खासदार सतीश पुनिया, सिक्कीमचे राज्यपाल ओम प्रकाश माथूर आणि आमदार रवींद्र सिंह भाटी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली होती. उल्लेखनीय म्हणजे, निर्माते असित कुमार मोदी यांच्यासोबत झालेल्या वादानंतर शैलेश लोढा यांनी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही लोकप्रिय मालिका सोडली होती.